Maharashtra Metro Ridership Report: राज्यात शहरी भागात जलद आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी तब्बल ९७ हजार कोटी रुपये खर्चून मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये उभारण्यात आलेल्या नऊ मेट्रो प्रकल्पांना आता प्रवाशांची प्रतिक्षा आहे. सुरु झालेल्या नऊ मेट्रो प्रकल्पांच्या आराखड्यानुसार दररोज सुमारे ७० लाख ५० हजार प्रवासी अपेक्षित असताना प्रत्यक्षात सर्व मेट्रो मार्गांवरुन दररोज केवळ १३ लाख ३२ हजार (१८.८९ टक्के) प्रवाशी प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधांसोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यातही मेट्रो प्रकल्पांवर विशेष भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत या प्रकल्पांना गती देण्याचे आदेश सबंधित प्रशासनाला दिले होते. राज्य सरकारच्या मदतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए), मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन( एमएमआरसीएल), महामेट्रो आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशाततब्बल २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपये खर्चाचे ६८४ किलोमीटर लांबींचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यापैकी मुंबई महानगर प्रदेशात १०१.२० किलोमीटर, पुणे महानगर प्रदेशात ३३.२८ किलोमीटर तर पुणे महानगर प्रदेशात ४०किलोमीटर अशा १७४ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत आहेत. राज्यात मुंबईत घाटकोपर- वर्सोवा मार्गावर ८ जून २०१४ रोजी पहिली मेट्रो सुरु झाली. त्यानंतर टप्या टप्याने मुंबई मेट्रो लाईन-२ अ, मेट्रो लाईन-७, कुलाबा- सिप्झ मेट्रो लाईन-३, नवी मुंबई मेट्रो लाईन-१, पुणे मेट्रो टप्पा-१, नागपूर मेट्रो टप्पा-१, मुंबई मेट्रो लाईन-२ब आणि मुंबई मेट्रो लाईन- ९ अशा नऊ मार्गावर मेट्रो सुरु झाल्या आहेत. या नऊ प्रकल्पांवर सुमारे ९७ हजार ९३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

प्रवाशांची पाठ

विविध महानगरातील मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या असल्या तरी प्रवाशांनी मात्र या सुखकारक प्रवासाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारी आणि मेट्रो प्रकल्पांच्या प्रकल्प अहवालानुसार या मार्गांवर दररोज किमान ७० लाख ५० हजार प्रवाशी अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात आजमितीस १३ लाख ३२ हजार(१८.८९ टक्के) प्रवाशी दररोज मेट्रोचा लाभ घेत आहेत. त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरण्यासाठी शहरी बस, टॅक्सी, रिक्षा किंवा खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देणाऱ्या या प्रवाशांना मेट्रोकडे वळविणे या प्राधिकरणांसाठी आव्हान ठरत आहे.

त्यातच तर येत्या चार वर्षात आणखी ३०० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याशिवाय १३० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत असून ८७.१५ किलोमीटर मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे.

मुंबई महानगर प्रदेशात विविध मेट्रो प्रकल्पांची कामे सुरु असून काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हे सर्व प्रकल्प परस्परांना जोडल्यानंतर टप्या टप्याने प्रवाशांची संख्या वाढेल. मेट्रो स्ठानकांच्या परिसरात कार्यालये, व्यवसाय, उद्योग स्थापित झाल्यावर तसेच प्रवाशांना कोणत्याही ठिकाणाहून कोठेही जाण्याची मेट्रोची सुविधा निर्माण झाल्यानंतर प्रवाशी मेट्रोकडे वळतील. सन २००२मध्ये सुरु झालेल्या दिल्ली मेट्रोने ३९० किलोमीटरचे जाळे विस्तारले असूनही आज त्यांच्याकडे २४ वर्षांनंतर ५० लाख प्रवासी आहेत. चेन्नई आणि बंगरुळू शहरांमध्येही मेट्रोला मुंबईसारखाच प्रतिसाद आहे. आपल्याकडे बेस्ट बसेस वाढल्या आणि लास्ट माईल कनेक्टिविटी तयार झाल्यानंतर जसा आज उपगरीय गाड्यांकडे आहे तसा मेट्रोकडे प्रवाशांचा ओढा वाढेल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक मुंबई मेट्रो रेल कार्पेारेशन

प्रकल्पांची सद्यस्थिती

मुंबई महानगर प्रदेशातील परिस्थिती

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मध्ये एकूण ४२८.८९ किलोमीटरचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यापैकी घाटकोपर- वर्सोवा मेट्रो-१, कुलाबा-सिप्झ मेट्रो-३ तसेच २अ आणि ७ या मार्गिका सुरु असून मेट्रो २ब आणि ९चा पहिला टप्पा सुरु झाला आहे. मेट्रो-१ वर दररोज अपेक्षित ७.४५ लाखांच्या तुलनेत ४.४१ लाख (५९.१९टक्के) प्रवाशी प्रवास करीत आहेत. मेट्रो-३ या भूयारी मेट्रो प्रकल्पात १७ लाख प्रवाशी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २ लाख १० हजार(१२.३५टक्के), लाईन -२अ आणि ७ वर १२ लाख७९ हजार प्रवाशी अपेक्षित असताना २ लाख ७२ हजार मुंबईकर प्रवास करीत आहेत. नवी मुंबई मेट्रोवर दररोज एक लाख प्रवाशांचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ४६ हजार प्रवासी लाभ घेत आहेत.

पुणे महानगर प्रदेशात (पीएमआर)

एकूण १६९.४५ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे निर्माण करण्यात येत असून पहिल्या टप्यात ३३.२८ किलोमीटर लांबीची मार्गिका सुरु करण्यात आली आहे. तेथे दररोज ६.९ लाख प्रवाशांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात २ लाख २३ हजार(३६.६२ टक्के) प्रवासी मेट्रोचा लाभ घेतात.

नागपूर महानगर प्रदेशात (एनएमआर)

नागपूरमध्ये पहिल्या टप्यात ४० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावत असून अपेक्षित ४.१० लाख प्रवाशांच्या तुलनेत सध्या केवळ एक लाख प्रवासी प्रवास करतात.. शहरात एकूण ८५.२० किलोमीटरचे मेट्रो मार्गांचे जाळे विकसित होत आहे. येत्या वर्षभरामध्ये यातील ८७ किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.