मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीची प्रवेश नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. या सात अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणीची ही तिसरी मुदतवाढ आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीसाठी १८ मार्च २०२६ पर्यंत मुदत होती.
आजपर्यंत या सात अभ्यासक्रमांसाठी ६६ हजार २८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी अर्ज नोंदणी झाल्याने सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गतवर्षी बी.एचएमसीटी सीईटीसाठी १ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांसाठी १ लाख १२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.
नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी गरजेचे पण बंधनकारक नाही
यावर्षी पासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी ) गरजेचे आहे, पण बंधनकारक नाही.
विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोदणी करावी यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. काही तांत्रिक कारणांमुळे जर अपार आयडी व युडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यानाही अपार आयडी व युडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येईल. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
