मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्यानंतर ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर ही परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.

महाटीईटी २०२६ ही परीक्षा २८ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ साठी २ लाख ५८ हजार ६१ आणि पेपर क्रमांक २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ असे एकूण ६ लाख १२५ उमेदवारांनी अर्ज केले होते. राज्यभरात पेपर क्रमांक १ साठी ७०१ आणि पेपर क्रमांक २ साठी १ हजार २८ अशी एकूण १ हजार ७२९ परीक्षा केंद्रे निश्चित केली होती. मात्र २८ जूनच्या आदल्यादिवशीच म्हणजे २७ जून रोजी भिवंडीमध्ये पेपर फुटल्याचे उघडकीस आले. त्यामुळे परिषदेने तातडीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर ही परीक्षा नव्याने व ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी परिषदेने आयबीपीएसची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परीक्षा परिषदेने पत्रात नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सेवेत असलेल्या तसेच नव्याने सेवेत येणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी २०२८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार असून भविष्यात ही परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर टीईटी लवकर, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्याबाबत राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे विनंती केली आहे.