मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आह़े  महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट शिंदे यांनी घातल्याने त्यांच्या परतीचे दोर कापले गेल्याचे संकेत आहेत़  त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आह़े

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटण्याची आणि राज्य सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसू लागली होती. विधान परिषद निवडणुकीत तसेच घडल़े  शिवसेनेबरोबरच कॉंग्रेसची मते फुटली आणि भाजपला पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली. भाजपच्या विजयानंतर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही राज्यातील बदलत्या समीकरणांची नांदी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर रात्रीत हालचाली झाल्या आणि एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांसह सूरतकडे रवाना झाले. गुजरात भाजपचे अध्यक्ष व खासदार सी. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली आणि कडक पोलीस बंदोबस्तात ‘ला मेरिडियन’ या हॉटेलात शिंदे यांनी समर्थक आमदारांसह मुक्काम ठोकला आहे.

नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थकांसह फुटून भाजपशी हातमिळवणी करू शकतात, अशी चर्चा केवळ महाविकास आघाडी सरकार आल्यावरच नव्हे, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतानाही सुरू असायची. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. नगरविकास विभागात आणि एमएमआरडीएच्या कारभारात ‘मातोश्री’चा हस्तक्षेप वाढल्याने एकनाथ शिंदे नाराज अशा बातम्या येत होत्या. अखेर विधान परिषद निवडणुकीनंतर  शिंदे यांचे हे बहुचर्चित बंड झाले. मात्र, शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत, याची खात्रीशीर माहिती उघड मिळू शकलेली नाही. पण, सुमारे २० पेक्षा अधिक आमदार त्यांच्याबरोबर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षां’ बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली. त्याचवेळी सचिव मििलद नार्वेकर आणि ठाण्यातील रवींद्र फाटक यांना शिंदे यांची भेट घेण्यासाठी सूरतला पाठवण्यात आले.

‘वर्षां’वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्ष गटनेतेपदावरून दूर करत अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर याबाबतच्या ठरावाची प्रत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्राची प्रत घेऊन पक्ष प्रतोद सुनील प्रभू, खासदार अनिल देसाई, मुख्य प्रवक्ते अरिवद सावंत हे अजय चौधरी यांच्यासह विधानभवनात आले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन तो प्रस्ताव त्यांना देण्यात आला. विधिमंडळ सचिवालयातील कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून झिरवळ यांनी सायंकाळी अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा गट असल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकारच्या बहुमताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या बहुमताबाबत भाजप प्रश्न उपस्थित करत अविश्वास ठराव आणणार की आणखी कोणती रणनीती आखणार यावर राज्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

शिंदे यांचे ट्विट

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत.. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदूत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही़, असे ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी आपण हिंदूत्वासाठी बंडाचा झेंडा घेतल्याचे सूचित केले आहे.

पक्षांतरबंदी कारवाई की पोटनिवडणुका?

पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई होऊ नये, यासाठी दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. शिवसेनेचे ५५ आमदार असल्याने पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येऊ नये, यासाठी शिंदे यांना ३६ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. अन्यथा, पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. एवढे संख्याबळ नसल्यास कर्नाटक किंवा मध्य प्रदेशच्या धर्तीवर आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा पोटनिवडणुकांचा सामना करावा लागेल.

काँग्रेस सावध

* विधान परिषद निवडणुकीत पक्षाची मते फुटून पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेस सावध झाली आह़े

* काँग्रेसने पक्षात फाटाफूट होऊ नये, यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी सकाळी बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली़  मुंबईबाहेर असलेल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

* राज्यातील राजकीय घडोमोडींमुळे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची निरीक्षक म्हणून नियुक्त केली असून, ते बुधवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत.

शिवसेना भवनासमोर शिंदेंविरोधात घोषणाबाजी

एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांनी बंड पुकारल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मंगळवारी शिवसेना भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे हे गेली साडेसात वर्षे मंत्रिपदी आहेत. ठाणे जिल्ह्यात पक्षांतर्गत कारभारात त्यांना मुक्त वाव आहे. मग, शिंदे नाराज कसे, असा सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता.

ठाकरे-शिंदे संवाद

मिलिंद नार्वेकर यांनी सूरतला जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली़  तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही शिंदे यांनी संवाद साधला. हिंदूत्ववादी भाजपसह युती करा, बाकी मला काही नको, अशी भूमिका शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडे मांडल्याचे समजते. तुम्ही मुंबईत या, चर्चा करू, असे ठाकरे यांनी सांगितल्यावर, आधी तुम्ही युतीचे आश्वासन द्यावे, असा आग्रह शिंदे यांनी धरल्याचे समजते. एकंदर, आपण परतीचे दोर कापले आहेत, असेच अप्रत्यक्ष संकेत शिंदे सध्या देत असल्याचे शिवसेनेतील नेत्यांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात केलेले बंड ही शिवसेनेची अंतर्गत बाब आह़े  महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आह़े  या राजकीय संकटातून मार्ग काढला जाईल़

शरद पवार, ज्येष्ठ नेते

भाजपच्या वेगवान हालचाली

मुंबई : आघाडी सरकारला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून वेगाने हालचाली सुरू आहेत़़  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ पक्षनेत्यांची भेट घेतली़  फडणवीस यांच्यासह काही भाजप नेते एकनाथ शिंदे आणि फुटीर आमदारांच्या संपर्कात आहेत. शिंदे आणि समर्थक आमदारांना सूरतला पाठविण्यामागे भाजपचे नियोजन असून, फडणवीस, गिरीश महाजन, संजय कुटे यांच्यासह काही भाजप नेते शिंदे यांच्याशी चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.