मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपप्रचाराद्वारे जनतेची दिशाभूल करून दलित व आदिवासी समाजाची मते मिळविली. विरोधकांनी निर्माण केलेले हे कथानक दूर करण्याकरिता भाजप नेते व कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन हा अपप्रचार खोडून काढण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. तसेच महायुती आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याचा मनोदय जाहीर केला होता. पण पराभवाची जबाबदारी ३५ लाख कार्यकर्त्यांची असून फडणवीस यांनी सरकारमधील जबाबदारी पार पाडत संघटना मजबूत करावी, असा ठराव प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हेही वाचा >>> मोठी बातमी: मुंबईतल्या अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे, चिंतन आणि विधानसभा निवडणूक तयारी यासंदर्भात भाजपच्या मतदान केंद्र प्रमुख, आमदार, कार्यसमिती, सुकाणू समिती आदींच्या चार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सह संघटन मंत्री व महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार व अन्य पदाधिकारी या बैठकांमध्ये सहभागी झाले होते.

मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत जातपात व धर्म यापलीकडे जाऊन केलेला सर्वसमावेशक विकास, आगामी पाच वर्षात मोदी सरकारचे विकसित भारताचे लक्ष्य आदी मुद्दे जनतेपर्यंत पोचविण्यात येतील . आगामी काळात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ४८ नेते भेट देऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करणार आहेत. तसेच नवमतदार नोंदणी अभियानही हाती घेतले.

वक्फ बोर्डाला राज्य सरकारने दिलेल्या निधीबाबत बावनकुळे म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या नोंदींमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. ज्या सरकारच्या काळात चुकीच्या नोंदी करून वक्फ ला जमिनी देण्यात आल्या, त्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी हा निधी आहे. या ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना त्या परत मिळाल्या पाहिजेत. चुकीच्या नोंदी दुरुस्त झाल्या पाहिजेत, अशीच सरकारची भूमिका असावी.

महिलांचीही फसणूक

केवळ दलित व मागास वर्गाचीच नव्हे तर विरोधकांनी महिलांचीही फसवणूक केली आहे. महिलांच्या खात्यात दरमहा आठ हजार ५०० रुपये ‘खटाखट’ जमा होतील, असे खोटे आश्वासन देऊन महिलांना भुलविले. संविधानासमोर नतमस्तक होऊन भाजपप्रणीत रालोआ(एनडीए) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता विकसित भारत घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वांरवार सांगितले होते. विरोधकांनी खोटे सांगून मागास आणि दलितांच्या मनात भय पसरविले. मात्र आता कुठल्याही प्रकारचे भय त्यांच्या मनात नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

स्मार्ट मीटरची सक्ती नाही

स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनेच घेतला होता. जोपर्यंत जनतेच्या मनातील संभ्रम दूर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात स्मार्ट मीटर लागणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत स्पष्ट केले. स्मार्ट मीटरवरून जनतेत निर्माण झालेली नाराजी दूर करण्यावर भाजपने भर दिला आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण व पराभवाच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रदेश पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचा खोटा प्रचार जनतेपर्यंत जाऊन गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप