मुंबई : पावसाअभावी राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला असतानाच अपुऱ्या पावसाचा फटका महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेडच्या (महाबीज) बिजोत्पादन कार्यक्रमाला बसला आहे. खरीप हंगामात विविध प्रकारच्या पाच लाख क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्टे होते, प्रत्यक्षात तीन लाखांपर्यंतही बियाणे उत्पादन होण्याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे.

महाबीज राज्यभरात शेतकऱ्यांच्या मदतीने बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम राबविते. सिंचनाची सुविधा, अनुभव असलेल्या शेतकऱ्यांशी करार केले जातात. मूळ बियाणांसह विविध प्रकारची मदतही महाबीज करते. पण, पुरेसा पाऊस न पडल्यामुळे, हवेत उष्णता वाढल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. ऐन काढणीच्या वेळी पाणी कमी पडल्यामुळे बियाणांचे उत्पादन आणि दर्जा घटला आहे.

३६ लाख हेक्टर, १५ हजार बिजोत्पादक शेतकरी

खरीप हंगामात महाबीज सोयाबीन, मूग, उडीद आदी बियाणांचे सुमारे पाच लाख क्विंटल बियाणांचे उत्पादन करते. राज्यभरात सुमारे १५ हजार बिजोत्पादक शेतकरी सुमारे ३६ लाख हेक्टरवर बियाणांचे उत्पादन घेतले जाते. हिंगोली, वाशिममध्ये प्रति एकरी ९ ते १० क्विंटल सोयाबीन उत्पादन होते, तिथे प्रत्यक्षात ५ ते ६ क्विंटल बियाणे उत्पादित होण्याचा अंदाज आहे. हवेत बाष्प कमी असल्यामुळे, काढणीच्या काळात तापमान जास्त राहिल्यामुळे बियाणांमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण क्षमता कमी होणार आहे. डिसेंबरअखेर उत्पादनात किती घट झाली, याची निश्चित आकडेवारी हाती आल्यानंतर पुढील हंगामाची गरज भागविण्यासाठी अन्य राज्यांतून बियाणांची आवक केली जाईल. सोयाबीनचे कच्चे बियाणे कमी आकाराचे घ्यावे, असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. त्या बाबत केंद्र सरकारला कळविले आहे, केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार त्या बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

रब्बी हंगामातील बियाणे उत्पादनावर परिणाम

रब्बी हंगामात साडेचार लाख बियाणे उत्पादनाचे उद्दिष्टे आहे. त्यात प्रामुख्याने गव्हू आणि हरभरा उत्पादन जास्त असते. त्यापैकी हरभरा कमी पाण्यावर येतो, त्यामुळे हरभरा बियाणे उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. पण, गव्हू बियाणे उत्पादन अडचणीत येईल. त्यामुळे परराज्यांत बियाणे उत्पादन कार्यक्रम राबवावा लागणार आहे. राज्यात नाशिक सारख्या सिंचनाची चांगली व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गव्हू बिजोत्पादन करण्यात येणार आहे. भविष्यात कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हू, हरभरा बियाणांवर भर दिला जाईल, अशी माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी दिली.

अन्य राज्यांत बियाणे उत्पादन

महाबीजच्या बियाणे उत्पादन कार्यक्रमात दोन लाख क्विंटलपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. एल – निनोचा अंदाज असल्यामुळे छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेशात बियाणे उत्पादन केले असून, त्या पासून ६० हजार क्विंटल बियाणे मिळणार आहे. पुढील वर्षीच्या बियाणांच्या उपलब्धतेवर परिणाम होणार आहे. पण, तुटवडा भरून काढण्यासाठी अन्य राज्यांची मदत घेतली जाईल. बियाणे उत्पादनात अनेक ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यात कमी पाण्यावर येणाऱ्या बियाणांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी दिली.