मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश नोंदणी करण्यासाठी १८ मार्चपर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) मुदतवाढ देण्यात आली आहे. या सातही अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंत मुदत होती.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड)

या सात अभ्यासक्रमासाठी १४ जानेवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना ४ मार्चपर्यंत मुदवाढ देण्यात आली होती. ही मुदत बुधवारी संपल्याने सीईटी कक्षाकडून या सातही अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना १८ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. आतापर्यंत या सातही अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २८ ते ३० एप्रिल रोजी होणार आहे.

गेल्यावर्षी (२०२५) बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १४३६ व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १ लाख १२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत.

नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी गरजेचे पण बंधनकारक नाही

विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अपार आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युडीआयडी गरजेचे केले आहे पण बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोदणी करावी यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. काही तांत्रिक कारणामुळे अपार आयडी व युडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यानाही अपार आयडी व युडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येणार आहे.