‘चवदार तळ्या’वरून सत्ताधाऱ्यांची कोंडी

जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आदेशात जलपूजन असा स्पष्ट उल्लेख असताना शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.

‘लोकसत्ता’ने प्रथम प्रसिद्ध केलेले चवदार तळ्याचे वृत्त

फर्गसन, शेतकरी आत्महत्या प्रकरणावरून गदारोळ; महिला आमदारांची प्रथमच अध्यक्षांसमोर घोषणाबाजी
चवदार तळ्याचे शिवसेना आमदाराने केलेले शुद्धीकरण, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात झालेली घोषणाबाजी तसेच मंत्रालयासमोर शेतकऱ्याने केलेली आत्महत्या यावरून राज्य विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला आमदारांनी अध्यक्षांसमोरील मेजापुढे जाऊन घोषणाबाजी करण्याचा प्रकार विधानसभेत घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली.
माधव कदम या नांदेड जिल्ह्य़ातील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर कीटकनाशक घेऊन आत्महत्या केल्याच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षाने सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली. सरकार शेतकऱ्यांबाबत अजिबात गंभीर नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, अजित पवार आदी सदस्यांनी केला. गरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असल्याने या सरकारला पाठिंबा दिल्याची आपल्याला शरम वाटते अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण नांदेड मतदारसंघाचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला. महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले व आत्महत्या रोखण्याकरिता सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ झाला.
चवदार तळ्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलेले शुद्धीकरण, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयात झालेली घोषणाबाजी व प्राचार्याचे पत्र, अकोल्यात धम्म परिषदेत झालेला गोंधळ यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पुण्यात जय भीम घोषणा दिल्या म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पणतूच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता, असा विरोधी सदस्यांचा आरोप होता. जितेंद्र आव्हाड, वर्षां गायकवाड, हर्षवर्धन सकपाळ आदी सदस्यांनी जय भीमच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. जम भीम बोलणे हा गुन्हा आहे का, असा सवाल आव्हाड व गायकवाड यांनी केला. चवदार तळ्याचे शुद्धीकरण करणारे शिवसेना आमदार गोगावले आणि अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली. शिवसेना आमदाराने बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचा अपमान केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. शिवसेना आमदार गोगावले यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला. जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो. त्यात शुद्धीकरण नव्हे जलपूजन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी सदस्य गोगावले यांचे म्हणणे ऐकून घेण्यासही तयार नव्हते. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आदेशात जलपूजन असा स्पष्ट उल्लेख असताना शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.

महिला आमदार आक्रमक
गोंधळातच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर दिले. सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ वर्षां गायकवाड, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, अमिता चव्हाण आणि निर्मला गावित (काँग्रेस) व ज्योती कलानी (राष्ट्रवादी) या सहा महिला सदस्या थेट अध्यक्षांसमोरील टेबलासमोर धडकल्या आणि जोरदार घोषणा देऊ लागल्या. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विनंती करूनही या महिला सदस्या मागे हटण्यास तयार नव्हत्या. आतापर्यंत महिला आमदार मोकळ्या जागेत जाऊन घोषणा द्यायच्या, पण विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच व्यासपीठावर जाऊन अध्यक्षांच्या मेजासमोर धरणे धरून घोषणा देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला.
भाजप आणि शिवसेनेची कोंडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सरकारला अजिबात आत्मीयता नाही, असा रंग देत विरोधकांनी जय भीम घोषणा आणि चवदार तळ्याचा मुद्दा भावनिक केल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी वारंवार करूनही मुख्यमंत्री सभागृहात फिरकले नाहीत. गोगावले यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे शिवसेनेचीही पंचाईत झाली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mahad historic chavdar lake issue hit in maharashtra assembly