मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शनिवारी नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. सरकारच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २९ नवीन योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त श्रीमती भुवनेश्वरी पी. तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
महाडीबीटीची व्यवस्था सुरू झाल्यापासून सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, योजनांचा गैरवापर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे सांगून फडणवीस यांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि योग्य पद्धतीने लाभ पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगितले. विविध विभागांच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात येत असून, भविष्यात शासनाच्या सर्व प्रमुख योजना या एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
आज लोकार्पण करण्यात आलेल्या २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना घरबसल्या अथवा जवळच्या सेवा केंद्रातून कमीत कमी अडचणींसह मिळावा, यासाठी भविष्यातही नागरिककेंद्री डिजिटल सुधारणांना अधिक वेग देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.
महाडीबीटीवर यापूर्वी ७६ योजना कार्यान्वित होत्या. आज आणखी २९ योजनांचा समावेश झाल्याने कार्यान्वित योजनांची एकूण संख्या १०५ झाली आहे. याशिवाय आणखी २३१ योजनांचे काम प्रक्रियेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
