मुंबई : सहा हजार कोटींच्या महादेव ॲप या ॲानलाईन सट्टा घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार सौरभ चंद्रकार याला ओमान पोलिसांनी भारताच्या विनंतीवरुन मस्कत येथे अटक केली आहे. याआधी त्याला २०२४ मध्ये दुबई पोलिसांनी अटक केली होती. परंतु कायदेशीर मार्गातून तो सुटला होता. आता पुन्हा ओमानमध्ये बनावट पासपोर्टवर प्रवेश करताना अटक करण्यात आली. ओमानसोबत भारताचा प्रत्यार्पण करार असल्यामुळे यावेळी तो ताब्यात येईल, असा तपास यंत्रणांना विश्वास आहे.
बनावट इंडोनेशियन पासपोर्टद्वारे बेकायदेशीरपणे ओमानमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी रॉयल ओमान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याआधी २०२४ मध्ये त्याला दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. परंतु कायदेशीर बाबींमुळे तो सुटला होता. त्यानंतर तो बनावट पासपोर्टच्या आधारे ओमानमध्ये पळून गेला होता. भारताने त्यांच्या विरुद्ध इंटरपोल नोटिस जारी केली होती.
चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक असून तो दुबईतून महादेव बुक बेटींग ॲप चालवत होता. छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी असलेला चंद्राकर दुबईत फळांचा रस विकण्याचे काम करायचा. करोना काळात टाळेबंदी असताना तो सट्टेबाजीशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आला. त्याने सट्टेबाजीस सुरुवात केली. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्याने हैदराबाद येथे जाऊन ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटींग ॲपची निर्मिती केली. त्यामुळे सध्या महादेव बुक ॲप प्रकरण देशात खूप गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात असल्याचा संशय आहे.
या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे. यासोबतच या ॲपच्या मदतीने यूजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी करण्यात येत होती. हे प्रकरण झारखंड राज्यापुरते मर्यादित होते. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे दुबईत लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी २०० कोटींचा खर्च केल्यामुळे ते तपास यंत्रणेच्या रडारवर आले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून दुबईला नेण्यासाठी खासगी विमान, लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना तसेच लग्नकार्याचे नियोजन, नर्तक, सजावटकारांनाही मुंबईतून पाचारण आदींमुळे हा विवाह सोहळा चर्चेत आला होता. त्यातच काही सिनेअभिनेत्यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यानुसार, मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले गेले आणि ४२ कोटी रुपये हॉटेल आरक्षणासाठी खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
