मुंबईः महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात गुन्ह्यातून कमावलेले सुमारे ५८० कोटी रुपये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोठवले. ईडीने याप्रकरणी नुकतीच कोलकाता, गुरुग्राम, दिल्ली, इंदूर, मुंबई आणि रायपूर येथील महादेव ऑनलाइन बुकशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी या ५८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली होती. या कारवाईत एक कोटी ८६ कोटी रुपये रोख, एक कोटी ७८ लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या छाप्यांमध्ये डिजिटल डेटा आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
संकेतस्थळासाठी नव्या वापरकर्त्यांची नोंदणी, त्यांच्यासाठी युजर आयडीची निर्मिती व बेनामी बँक खात्यावरून पैसे चलनात आणणे या कार्यपद्धतीवर महादेव बुक बेटींगचे कामकाज चालते. छत्तीसगड पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपास सुरू केला होता. त्यानंतर, विशाखापट्टणम पोलीस आणि इतर राज्यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांची दखल घेण्यात आली. या प्रकरणातील ईडीच्या तपासानुसार, महादेव ऑनलाइन बुकचे काम दुबईमधून चालवले जात आहे. त्यासाठी ७०-३० नफ्याच्या गुणोत्तरावर काम चालते. महादेव ऑनलाईन बुकचा प्रवर्तक रेड्डी अण्णा, फेअरप्ले इत्यादीसारख्या अनेक ऑनलाइन सट्टेबाजी ॲपमध्येही भागीदार अथवा प्रवर्तक आहे. बेटींगमधील कमाई हवालामार्फत परदेशात पाठवून तेथील खात्यांमध्ये जमा केली जाते.
पुढील तपासादरम्यान, ईडीने महादेव ऑनलाइन बुकच्या प्रवर्तकांसह इतर संबंधित प्रमुख व्यक्तींची माहिती मिळवली आहे. त्यात मूळचा कोलकाता येथील रहिवासी हरी शंकर तिब्रेवाल याच्याबाबत माहिती मिळाली आहे. हरिशंकर हा हवाला ऑपरेटर असून तो दुबईमध्ये वास्तव्याला आहे. त्याने महादेव ऑनलाइन बुकच्या प्रवर्तकांसोबत भागीदारी केली आहे. ईडीने त्याच्या ठिकाणांवर व त्याच्या साथीदारांच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवली. त्यात हरी शंकर स्काय एक्सचेंज या बेटिंग संकेतस्थळाचा मालक आहे. तसेच तो हे संकेतस्थळ चालवतो. त्याच्या दुबईतील संस्थांमार्फत ही रक्कम भारतीय शेअर बाजारात गुंतवत आहे. त्याने त्याच्या साथीदारांना अनेक कंपन्यांचे संचालक बनवले असून त्याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते. बेटिंगमधील फायद्यातून मिळालेली ५८० कोटी ७८ लाख रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती घेऊन ती ईडीने गोठवली आहे. यापूर्वी याप्रकरणात ५७२ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आली होती. त्यात १४२ कोटींच्या स्थावर व जंगम मालमत्तांचा समावेश आहे. या प्रकरणातील आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत १२९० कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात अथवा त्यावर टाच आणण्यात आली आहे.
हेही वाचा – परमीट रुममधील ‘मद्य’भेसळ आटोक्यात येणार! तपासणी यंत्र खरेदीसाठी शासनाची मान्यता
बेटींगचा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न
बेटिंग ॲपद्वारे कमावलेले कोट्यवधी रुपये हवालाद्वारे दुबईला पाठवले होते. त्यातील बहुतांश रक्कम ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, कुराकाओ आणि वानुआतू या देशात पाठवून ती तेथील चलनात आणली गेली. त्यानंतर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा ही रक्कम भारतात गुंतवण्यात आली. ही रक्कम परदेशी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) नावाखाली गुंतवण्यात आली. त्यासाठी परदेशात बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा मार्गाने भारतात गुंतवण्यात आलेली रक्कम सुमारे एक हजार कोटी रुपये आहे. ही रक्कम भारतीय शेअर बाजार, स्थावर मालमत्ता व कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचे ईडीमधील सूत्रांनी सांगितले.