जागावाटपाबाबत आपल्याला शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केला. शिवसेनेला आमची गरज नसेल, तर आम्ही सुद्धा शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि आघाडीमध्ये जागावाटपावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त जागा स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष प्रयत्नशील आहेत. भाजप आणि शिवसेनेने रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीतील मित्र पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपसोबत आपली ५० टक्के चर्चा झाली असल्याचे जानकर यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. मात्र, शिवसेनेकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांना जर आमच्याशी युती करण्याची गरज नसेल, तर आम्हीसुद्धा केवळ भाजपशी युती करून शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करू.