मुंबई : उन्हाळय़ाच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यांत लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १,३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सांगितले. ही वीज प्रति युनिट सरासरी सहा रुपये एक पैसा दराने घेण्यात आली असून त्यासाठी सुमारे ८०५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. उन्हाळय़ातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीजपुरवठय़ाचे नियोजन करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महावितरणने ही जादा वीजखरेदी केली. त्यामुळे महावितरणला ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा करता आला आणि कुठेही भारनियमन होऊ दिले नाही. उन्हाळय़ामुळे महावितरणच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात विजेची कमाल मागणी अनुक्रमे २४,९८३ मेगावॉट व २४,३२६ मेगावॉट नोंदली गेली आहे. मे महिन्यातील कमाल मागणी २४,०४७ मेगावॉट होती. मार्च महिन्यात ३०० मेगावॉट, एप्रिलमध्ये ४०० मेगावॉट आणि मे महिन्यात ४०० मेगावॉट विजेच्या खरेदीसाठी लघुकालीन करार करण्यात आले होते. या माध्यमातून या तीन महिन्यात महावितरणने ६५६ दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली. उन्हाळय़ातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने पॉवर एक्सचेंजच्या माध्यमातून वीजखरेदी केली. विजेची उपलब्धता आणि दर लक्षात घेऊन नियमितपणे पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदी केली जाते. महावितरणने पॉवर एक्सचेंजवरून मार्च महिन्यात १३९ दशलक्ष युनिट तर एप्रिल महिन्यात ३२९ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. मे महिन्यातील वीज खरेदी २१६ दशलक्ष युनिट इतकी होती. महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे मार्चमध्ये ५०० मेगावॉट, एप्रिलमध्ये ४५० मेगावॉट आणि मे महिन्यात २५० मेगावॉट वीज उपलब्ध केली. पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल, त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार १९०० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळय़ात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यात महावितरणकडून मोठय़ा प्रमाणात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर गरजेनुसार काही वेळ वीजपुरवठा खंडित करावा लागतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर महावितरणकडे वीज उपलब्ध असूनही ग्राहकांना पुरवठा करता येत नाही. तथापि, राज्यात मागणीनुसार उपलब्ध वीज नाही अशी समस्या महावितरणला जाणवलेली नाही, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नमूद केले.