मुंबई : शासकीय दाखले, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज, कागदपत्रांचे सादरीकरण किंवा अन्य ऑनलाइन शासकीय कामे करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांना आजच घाई करावी लागणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या (महाआयटी) प्रणाली अद्ययावतीकरण आणि डेटा सेंटर स्थलांतराच्या कामामुळे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवा आजपासून (१६ ऑक्टोबर) दुपारी चार वाजल्यापासून तात्पुरत्या बंद राहणार आहेत. या सेवा मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुदतीचे अर्ज भरणाऱ्या तसेच सरकारी ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेली आणि देखभाल केली जाणारी विविध शासकीय संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स तसेच नागरिक आणि सामाईक सेवा केंद्रचालकांसाठीच्या (व्हीएलई) सेवा या काळात पूर्णपणे अनुपलब्ध राहतील. त्यामुळे संबंधित सेवांवर अवलंबून असलेली कामे करता येणार नाहीत. कोणकोणत्या विभागांच्या सेवा या कालावधीत प्रभावित होतील, याची स्वतंत्र सेवावार माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आपल्या कामासाठी संबंधित विभागाकडून खातरजमा करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या डिजिटल सेवांची कार्यक्षमता वाढविणे, तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक स्थिर करणे आणि ऑनलाइन सेवा सुरक्षित व विश्वासार्ह बनविणे, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोमवार, १९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा महाआयटीचा प्रयत्न आहे. त्यानंतर तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यावर मंगळवारी सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी तातडीचे ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि इतर प्रलंबित व्यवहार आज दुपारी चार वाजण्यापूर्वी पूर्ण करावेत, असे आवाहन महाआयटीने केले आहे. नियोजित तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी काय करावे?
- आज दुपारी चारपूर्वी मुदतीचे आणि तातडीचे ऑनलाइन अर्ज पूर्ण करावेत.
- आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची आणि अर्जाची पावती मिळाल्याची खात्री करावी.
- पुढील काही दिवसांत अर्जाची मुदत संपत असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधून पर्यायी व्यवस्था किंवा मुदतवाढीबाबत माहिती घ्यावी.
- सेवा पूर्ववत सुरू झाल्याची खात्री केल्यानंतरच प्रलंबित ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा.
