मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक), मुंबई येथे विविध पदांवर काम करण्यासाठी राज्य सरकारकडून आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये आस्थापना अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी या प्रत्येकी एका पदाचा समावेश असून, कंत्राटी किंवा सेवा करार पद्धतीने ही नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून प्रशासकीय कामांत गती आणि अचूकता आणण्यासाठी भूस्थानिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यासाठी महाजिओटेक ही कंपनी स्थापन करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात तसेच सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जिओ-स्पेशिअल तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा आणि वैज्ञानिक माहिती पुरविण्याचे काम ही कंपनी करते.

यासाठी आस्थापना अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार असून यासाठी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता निकष आणि अर्जाचा नमुना नियोजन विभागाच्या http://www.plan.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत mahageotech@outlook.com किंवा desk1418.plan-mh@mah.gov.in या ई-मेल वर पाठविण्यास सांगण्यात आले आहे.