मुंबई : ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ला (महाज्योती) पुरेसा निधी मिळत नसल्याप्रकरणी एच.डी. च्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दाभोळकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून विद्यावेतन व अधिछात्रवृत्ती दिली जाते. अनुसूचित जातींसाठी असलेल्या ‘बार्टी’ संस्थेला व मराठा व कुणबी मराठा जातींसाठीच्या ‘सारथी’ संस्थेला पुरेसा निधी मिळतो, पण ‘महाज्योती’ला मिळत नाही. परिणामी, संशोधन करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असा या आंदोलक विद्यार्थ्यांनी आरोप केला.
आंदोलनाचे नेतृत्व धनगर समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केले. वित्तमंत्री या नात्याने अजित पवार संस्थेचा निधी रोखत आहेत, असा आंदोलकांचा आरोप आहे. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. याप्रकरणी हाके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पोलीस स्टेशनकडे केली आहे.