मुंबई : आरोग्य प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाकर्मी वैद्यकीय देयक दावा संकेतस्थळ’, तसेच राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम करणाऱ्या ‘वैद्यकीय अधिकारी व्यवस्थापन यंत्रणा’ या संकेतस्थळाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती जलद, पारदर्शक व सुलभ करण्यासाठी ‘महाकर्मी’ हे वैद्यकीय देयक दावा संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र कर्मचारी रुग्ण मित्र’ या संकल्पनेवर आधारित ही डिजिटल सुविधा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
आता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे अर्ज ऑनलाईन सादर करून त्यांचा निपटारा निश्चित कालमर्यादेत करण्यात येणार आहे. यामुळे कार्यालयीन दिरंगाई कमी होऊन प्रक्रियेला वेग येणार आहे. http://www.mahakarmi.com या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. याचबरोबर राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘वैद्यकीय अधिकारी व्यवस्थापन यंत्रणा’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे पदनिहाय माहिती, तज्ज्ञ व विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, संस्थात्मक माहिती, सेवा तपशील तसेच अनुपस्थिती नियंत्रण यांची अचूक नोंद http://www.vams.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
या प्रणालीमुळे जिल्हानिहाय तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तात्काळ लक्षात येणार असून ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय सेवांचे प्रभावी नियोजन करता येणार आहे. बदली, पदोन्नती व नवीन नियुक्त्यांची शास्त्रोक्त प्रक्रिया राबविता येणार असून डेटा-आधारित मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी या पोर्टलमध्ये विविध प्रकारचे ‘रिअल-टाइम’ अहवाल तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
सरकार कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा देणे ही आमची बांधिलकी आहे. या उपक्रमामुळे प्रतिपूर्ती प्रक्रियेत सुसूत्रता येऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा विश्वास अधिक बळकट होणार आहे. कर्मचाऱ्यांची सर्व देयके यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच निघाली पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे असलेले डेटा अचूक असावा. विभागाने यासंदर्भात योग्य ती पावले उचलावीत. वैद्यकीय देयके देण्याच्या बाबतीत विलंब होणार नाही याची जिल्ह्या शल्यचिकित्सकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तसेच सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा उपसंचालक दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
