कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या आरेतील कारशेड आणि काही दिवसांपूर्वी येथे करण्यात आलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) एकही वृक्ष तोडला नसल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एमएमआरसीचा खोटेपणा मुंबईकरांसमोर आणण्यासाठी रविवारी ‘आरे वाचवा’ आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. आरेतील पिकनिक पॉईंट येथे मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी जमण्यास सुरुवात झाली असून सरकार-एमएमआरसी विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या आंदोलनात आता ‘वंचित बहुजन आघाडी’ही सहभागी झाली आहे. रविवारच्या आंदोलनात ‘आप’ आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत. शिवसेना, काँग्रेसचा ही ‘आरे वाचवा’ आंदोलनाला पाठींबा आहे. आता ‘वंचित’नेही ‘आरे वाचवा’, ‘झाडे वाचवा’ची हाक दिली आहे. महामोर्चाच्या माध्यमातून वंचितचे कार्यकर्ते आरे आंदोलनात सहभागी होत असून या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर करीत आहेत.

आरेमध्ये दर रविवारी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत –

आरेमध्ये कारशेड नेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सुमारे दोन-अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘आरे वाचवा’ आंदोलन सुरू झाले. आरेमध्ये दर रविवारी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र पर्यावरणप्रेमींच्या याविरोधाला न जुमानता सरकारने आरेमध्ये कारशेडचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर एमएमआरसीने मेट्रोेचे डबे आणण्याच्या नावाखाली आरेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड केली, असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर आरेचा वाद आणखी चिघळला असून रविवारचे आंदोलनही व्यापक होत चालले आहे. आंदोलनाला सर्वसामान्यांचाही पाठींबा मिळू लागला आहे.

एमएमआरसीच्या स्पष्टीकरणानंतर पर्यावरणप्रेमी प्रचंड नाराज –

आरेमध्ये होऊ घातलेल्या कारशेडच्या जागेतील एकही वृक्ष तोडलेला नाही. केवळ गवत आणि झुडपे हटविण्यात आली, असे एमएमआरसीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. एमएमआरसीच्या या स्पष्टीकरणानंतर पर्यावरणप्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. एमएमआरसी खोटे बोलत आहे, न्यायालयाची दिशाभूल करीत आहे, असा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी आंदोलन तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणप्रेमी, सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच आता विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांही आरे वाचवा आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.