ठाणे, मुंबई, नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गासह अंतर्गत मार्गावर पुन्हा खड्डे पडले. त्यातच चार दिवसांच्या सुट्टय़ांनंतर मार्गावर वाहनांची पुन्हा वर्दळ वाढल्याने बुधवारी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

नवी मुंबईतील ऐरोली खाडी पुलाजवळ सुरू असलेल्या कामामुळे तेथून मुंबईकडे येणारी आणि जाणारी रस्ते वाहतूक दुपारपासून ठप्प झाली. शिळफाटा ते तळोजा-पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहने दीर्घकाळपर्यंत अडकून पडली. याचा एकूण ताण अनेक शहरांच्या अंतर्गत वाहतुकीवर पडला. गेल्या महिन्यापासून वाढत चाललेल्या आणि कोणताच तोडगा निघत नसलेल्या या कोंडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव खाडी पुलावर खड्डे पडले असल्याने या भागांत वाहनांचा वेग मंदावला.  ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत वाहतुकीस मुभा असल्याने खड्डे बुजविण्याच्या कामामुळे ही वाहतूक खोळंबली. त्याचाच परिणाम म्हणून निश्चित केलेल्या वेळेनंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. अवजड वाहने आणि नोकरदारांची वाहने एकाचवेळी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी कोंडी झाली. काही भागांत एक ते दोन किलोमीटर अंतरासाठी अध्र्या तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते माजिवडा आणि साकेत पूल ते रांजनोली नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेएनपीटी बंदरातून हजारो अवजड वाहने मुंबई, घोडबंदरच्या दिशेने जाण्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून वाहतूक करतात. परंतु या मार्गाला जोडणाऱ्या खारेगाव टोलनाका भागात खड्डे पडले असल्याने वाहनांचा वेग कमी झाला. या मार्गावरील खारेगाव ते शिळफाटा वाय जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कल्याण-शिळफाटा मार्गावरील मानपाडा, काटई, पलावा चौक, देसाई, पडले भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. ऐरोली टोलनाका ते ऐरोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर ऐरोली, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी शेकडो वाहने कोंडीत अडकून होती.

वाहतुकीचा अड‘कित्ता’ कुठे?

मुंबई-नाशिक महामार्ग, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, काटईनाका ते शिळफाटा, शिळफाटा ते तळोजा-पनवेलमार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग, जुना आग्रा रोड, मुलुंड – ऐरोली मार्ग या भागांत वाहतूक दिवसभरात अनेकवेळा अडकली होती.

नवे कारण..

राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी पहाटे अनेक भागांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. काही अंतर्गत मार्गावर दहीहंडी सोहळय़ांसाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असून यामुळेही कोंडीत भर पडली.

उद्या भीषण कोंडी?

दहीहंडी उत्सवासाठी मुंबई- ठाण्यासह उपनगरांतील अनेक भागांत रस्त्यात मंडप उभारण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे शुक्रवारी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.

खड्डय़ांमुळे बोरिवलीमध्ये दाम्पत्याचा मृत्यू

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पुलावर खड्डे चुकवताना दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. या दोघांच्याही अंगावरून डम्पर गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नाझीर शहा (४३) व छाया खिलारे (४३) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.