मुंबईतील साकीनाका भागातल्या खैरानी रोडवर गुरवारी सकाळी १० च्या सुमारास उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची घटना घडली. सुमारे चार तासांच्या शोधमोहिमेनंतर संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या दुर्घटनेत या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची उपमहापौर संजय घाडी यांनी दिली. अस्लम शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी आता मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?

मुंबईतल्या एल वॉर्डमध्ये जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. अस्लम शेख यांचा या घटनेत मृत्यू झाला. ही घटना वेदना देणारी आहे. मुंबई महानगर पालिकेने याआधीच्या घटनांचा आढावा घेऊन सगळ्या मॅनहोल्सवर जाळी बसवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. मुंबईतली मॅन होल्स पाहिली तर मुंबईत १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल्स आहेत. सिवरेज ऑपरेशन आणि SWT ची मॅनहोल्स आहेत. यापैकी ९६ हजार मॅनहोल्सवर आपण जाळी बसवलेली आहे. ४ हजार ४४६ मॅनहोल्स अशी होती जी रस्त्यांच्या कामांमुळे उघडावी लागली होती, त्यावरही जाळी लावण्याचं काम चाललं आहे. उच्च न्यायालयातही आम्ही याबाबतची माहिती आणि तपशील दिला आहे.

सुरक्षा जाळी लावण्याचं काम सुरु असतानाच अपघात

आज घडलेली घटना ही L वॉर्डमधली आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ७५ मॅनहोल्सवरच्या जाळ्या लावणं बाकी होतं. पण जो ताजा अहवाल आमच्याकडे आला आहे त्यानुसार एल वॉर्डमधल्या चार मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचं काम राहिलं होतं. त्याच्यापैकी एकाचं जाळी लावण्याचं काम वॉर्डने हाती घेतलं होतं. त्यामुळे ते मॅनहोल उघडण्यात आलं होतं. सुरक्षेसाठीच काम होत असताना कंत्राटदारांनी, कामगारांनी पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती. पण मी सीसीटीव्ही फुटेज उभं पाहिल्यावर हे लक्षात आलं की तिथे सुरक्षेची व्यवस्था नीट केली नव्हती. दोन माणसं उभी केली होती त्यांच्याकडून सूचना दिल्या जात होत्या. पण साहजिक आहे की घाईने जाणाऱ्या माणसांना कदाचित या सूचना समजून घेता येत नाही, पण योग्य काळजी घेतली गेली नाही म्हणून हे पादचारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर घटना आहे. मागील तीन महिन्यांत मी ज्या बैठका घेतल्या, साईट व्हिजिट केल्या त्यात मॅनहोल्स सुरक्षित आहेत का? याचा आढावा घेतला होता. रस्त्यांच्या कामांमुळे जी मॅनहोल्स उघडण्यात आली होती त्यांचं काम शिल्लक राहिलं होतं. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.