मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा विस्तार करत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका भव्य शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून सेवा हमी कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत, राज्यातील किमान १० लाख कुटुंबांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून दिला जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
तीन पैकी एका दिवशी शिबीर
हे शिबिर २२ जुलै रोजी आयोजित केले जाईल. मात्र, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारचेही पर्याय दिले आहेत. त्यानुसार २२ जुलै (बुधवार), २५ जुलै (शनिवार) किंवा २६ जुलै (रविवार) या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचे आयोजन करतील.
महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र वाटप
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वच विभागांच्या (महसूल, कृषी, ग्रामविकास इत्यादी) मंजुर योजनांचे लाभ दिले जातील. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळखपत्र आणि दाखल्यांचे वाटप केले जाईल. तसेच राज्यातील गावठाणांचे जे ड्रोन व डिजिटल सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, त्या अंतर्गत तयार झालेल्या मालकी हक्काच्या ‘सनदचे (स्वामित्व पत्रिका) वाटप या दिवशी केले जाईल.
आमदारांना १० लाखांचा निधी
शिबिरांच्या आयोजनासाठी प्रत्येक मतदारसंघाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदारानी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिबिराची जागा निश्चित करावी.आणि रूपरेषा ठरवावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केली.
