मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्थान पेट्रो केमिकल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील ३ हजार १९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएल कंपनीचे ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ देण्यात येणार आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून, विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल व कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
यापूर्वी १०२ रुग्णवाहिकेची सेवा माता व बालकांसाठी वापरात होती. यापुढे १०२ रुग्णवाहिका सर्व रुग्णासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सेवा अधिक प्रभावी, सक्षम करून १०८ रुग्णवाहिकेला पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोरोनासारख्या संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची आठवण करून देत, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोठा आधार असून, नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सेवाभावाने आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
