मुंबई : इयत्ता अकरावीच्या २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रातील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून चार दिवसांत राज्यभरातून प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागासाठी ९० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली. यामध्ये पुणे आणि मुंबई शहरातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. विशेषतः मुंबई विभागात मुलींचा सहभाग अधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे.
१५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भरले शुल्क
गतवर्षीपासून संपूर्ण राज्यभरामध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षण संचालनालयाकडून यंदा अकरावी प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. ही नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्जाचा पहिला भाग पूर्ण करणे बंधनकारक आहे. अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून अवघ्या चार दिवसांमध्ये राज्यभरातून तब्बल ९० हजार ९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये मुलांची संख्या ४२ हजार ९७२, तर मुलींची संख्या ४२ हजार २४९ इतकी आहे. तसेच ४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी लिंग नोंद केलेले नाही. यातील १५ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. तर काही अर्ज अजून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई व पुण्यातून सर्वाधिक नोंदणी
शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार इतर प्रदेशातून सर्वाधिक ५१ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १३ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबईत मुलींची संख्या ७ हजार २७० असून, ती मुलांपेक्षा अधिक आहे. मुंबईमध्ये ६ हजार ६५३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पुणे विभागात १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून येथेही मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ३ हजार ६५७, कोल्हापूर विभागात २ हजार ५७०, अमरावतीत २ हजार ५०१, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नागपूर विभागात २ हजार ३६ विद्यार्थ्यांची नोंद झाली असून येथे मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. लातूर विभागात तुलनेने कमी म्हणजे १ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विभागाचा समावेश न केलेल्या ११५ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.
