मुंबई : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राज्यभरातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवून अर्ज निश्चित केले आहेत. तसेच दुसऱ्या फेरीसाठी दिलेल्या मुदतीत १ लाख २५ हजार ६९० विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरले आहेत. दुसरी प्रवेश यादी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या नियमित फेरीसाठी ६ ते ९ जून रोजी सायंकाळी ६ पर्यंत नव्याने विद्यार्थी नोंदणी, प्रवेश अर्जाच्या भाग-१ मधील दुरुस्ती, तसेच भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार ६ ते ९ जून या कालावधीमध्ये १ लाख २५ हजार ६९० विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख ६८ हजार ७७५ इतकी झाली. तसेच या कालावधीत राज्यातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून आपले अर्ज निश्चित केले. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप यादी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागातून सर्वाधिक १ लाख ७३ हजार २२३ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागात १ लाख १८ हजार ६१५ विद्यार्थी, नाशिक विभागात ८० हजार ७३३ विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर विभागात ७६ हजार ३१८ विद्यार्थी, कोल्हापूर विभागात ६६ हजार ४८० विद्यार्थी, अमरावती विभागात ६५ हजार १५३ विद्यार्थी, नागपूर विभागात ५६ हजार ७७३ विद्यार्थी आणि लातूर विभागात ४० हजार ७९२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत. त्याचप्रमाणे राज्याबाहेरील २ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवले आहेत. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती आणि पुढील कार्यवाही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

पहिल्या फेरीत ३ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

पहिली फेरी २९ मे ते ३ जून कालावधीत राबविण्यात आली. या फेरीसाठी जागा वाटप झालेल्या ४ लाख ६३ हजार २२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७२ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला. तसेच योग्य कागदपत्रांअभावी ४ हजार १४१ विद्यार्थ्यांचे

प्रवेश रद्द केले असून, २ हजार २५३ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश रद्द केले. तर ८४ हजार ५२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत.

विभागनिहाय पसंतीक्रम नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

विभाग- विद्यार्थी संख्या अमरावती- ६५,१५३ छत्रपती संभाजीनगर

– ७६,३१८ कोल्हापूर – ६६,४८० लातूर- ४०,७९२ मुंबई

– १,७३,२२३ नागपूर

– ५६,७७३ नाशिक

– ८०,७३३ पुणे

– १,१८,६१५ इतर

– २,६९९ एकूण – ६,८०,७८६