मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्या ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी सायंकाळपर्यंत ३ लाख २६ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर अद्यापपर्यंत २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केलेले नाहीत. या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी आहे. अखेरच्या दिवशी किती विद्यार्थी प्रवेश घेतात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध आहेत. राज्यभरातील १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आठ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करून प्रवेश प्रक्रियेत अंतिम सहभाग नोंदविला होता. यातील ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळाले. मात्र अद्यापपर्यंत त्यातील ३ लाख २६ हजार ८७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
यामध्ये ३ लाख ३९६ विद्यार्थ्यांनी नियमित फेरीद्वारे प्रवेश घेतला आहे. त्याशिवाय व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा आदी माध्यमांतून २६ हजार ४७४ प्रवेश झाले आहेत. पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २ लाख ४८ हजार विद्यार्थी अजूनही प्रवेश निश्चित करण्यापासून दूर आहेत.
शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ३ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील विभागनिहाय प्रवेशस्थिती
| विभाग | नियमित प्रवेश | कोटा प्रवेश | एकूण प्रवेश |
| अमरावती | ३१,९२० | ३,५८१ | ३५,५०१ |
| छत्रपती संभाजीनगर | ३३,४७० | २,६१२ | ३६,०८२ |
| कोल्हापूर | ३३,३९४ | २,५९८ | ३५,९९२ |
| लातूर | १८,७९४ | १,२१४ | २०,००८ |
| मुंबई | ४७,१४० | ६,९२७ | ५४,०६७ |
| नागपूर | ३७,८७५ | २,४१४ | ४०,२८९ |
| नाशिक | ३७,२२८ | २,३७४ | ३९,६०२ |
| पुणे | ६०,५७५ | ४,७५४ | ६५,३२९ |
| एकूण | ३,००,३९६ | २६,४७४ | ३,२६,८७० |
