मुंबई : सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर योग्य कारणांसाठी आणि निर्धारित उद्दिष्टांनुसार होतो की नाही, यावर आता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती नियंत्रण ठेवणार आहे. या अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना मंजुरी देण्याची जबाबदारीही या समितीकडे असेल, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा कालावधी २०२६-२७ ते २०३०-३१ असा पाच वर्षांचा आहे. केंद्र सरकारने २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयोगाचा अहवाल स्वीकारला. त्यानुसार विविध घटकांसाठी केंद्राकडून राज्याला अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

या निधीचा वापर आयोगाने निश्चित केलेल्या प्रयोजनांसाठीच व्हावा, तसेच निधीतून हाती घेतलेल्या योजनांचे मूल्यमापन करता यावे, यासाठी उच्चस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य सचिव अध्यक्ष

या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्य सचिव असतील. तर अपर मुख्य सचिव अथवा प्रधान सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव अथवा प्रधान सचिव किंवा सचिव (नियोजन) आणि संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव अथवा सचिव हे समितीचे सदस्य असतील.

समितीची बैठक दर सहा महिन्यांनी होणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीलाच सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार मिळणाऱ्या अनुदानांतर्गत विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचे प्रस्ताव तपासून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी भौतिक आणि आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली जातील. त्यांची पूर्तता कितपत झाली, यावरही समिती लक्ष ठेवणार आहे. संबंधित विभागाकडे बैठकीचे इतिवृत्त तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या समितीमुळे केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या वापरावर विभागनिहाय देखरेख ठेवण्याबरोबरच प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे.