मुंबई : राज्यभरात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळीव पाऊस सुरू आहे. त्यात भर म्हणून गत चार – पाच दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पूर्व मोसमी सरी बरसत आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, बंधारे, तलाव वाहू लागले आहेत. सुमारे ३५ हजार हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, संत्रा, केळीसह कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात चिखल झाल्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीचा खोळंबा झाला आहे.
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळीव पाऊस सुरू आहे. गत चार – पाच दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मोसमी पाऊस रविवारी तळकोकणात दाखल झाला आहे. सततच्या पावसामुळे राज्याच्या बहुतेक भागांतील नदी, नाले, बंधारे, तलाव भरून पाणी वाहू लागले आहेत. सततच्या पावसामुळे शेत शिवारात चिखल झाल्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीचा खोळंबा झाला आहे. वाफसा नसल्यामुळे पेरण्यांनाही विलंब होणार आहे.
नाशिक परिसरात सततच्या पावसामुळे काढणीला आलेला उन्हाळी कांदा शेतातच पडून आहे. अनेक ठिकाणी काढलेला कांदा शेताच्या बांधावरच पावसात भिजत आहे. हवेतील आद्रर्तेत अचानक वाढ झाल्यामुळे चाळीतील कांद्याला कोंब येण्याची, सडण्याची भीती आहे.
पावसामुळे पक्व झालेल्या डाळिंबाला तडे जाऊन डाळिंब सडू लागले आहेत. फळांवर काळे डाग पडत आहेत. अति पावसामुळे पूर्व हंगामी मृग बहारातील फुलोऱ्यात असलेल्या डाळिंबाच्या कळ्या गळून पडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली आहेत, अशी माहिती भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिली.
उन्हाळ्यात द्राक्षबागांच्या फळकाड्या पक्व होतात. पण, सततच्या पावसामुळे फळकाड्या पक्व झाल्या नाहीत. त्याचा परिणाम फळधारणेवर होणार आहे. सततच्या पावसामुळे सीताफळांचा हंगामाही महिनाभर अगोदरपासूनच सुरू होणार आहे. जळगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे मोडून पडली आहेत. वऱ्हाडातील संत्रा बागांना मृग बहरासाठी एप्रिल – मे महिन्यात पाण्याचा ताण दिला जातो, त्यानंतर जूनमधील पहिल्या पावसानंतर संत्र्याला बहार येतो. पण, संत्रा बागांना पाण्याचा ताण न मिळाल्यामुळे संत्र्यांच्या मृग बहारावर परिणाम होण्याची भीती आहे.
पेरणीची घाई न करण्याचे सरकारचे आवाहन
अनुकूल वातावरणामुळे सध्या मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू आहे. मोसमी पाऊस रविवारी तळकोकणात दाखल झाला आहे. सरासरी तारखेपेक्षा दहा दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मात्र, २७ मेपासून मोसमी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागांत पाच जूनपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.