मुंबई : हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीठ, अतिवृष्टी आणि पूरस्थिती सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. गतवर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास ९.१ टक्के होता, तो चालू आर्थिक वर्षांत ३.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हजारो कोटी रुपये खर्च करून राबविलेल्या कृषी योजनांचा कोणताच सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.
हवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, खते, बियाणे, मशागतीचा वाढलेला खर्च, वाढलेली मजुरी आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे शेती क्षेत्रासमोरील आव्हाने वाढत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत १०९.१ टक्के पाऊस झाला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील तालुके वगळता १४९ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात अवकाळी, अतिवृष्टी आणि पूरस्थितीने भर घातली.
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे गतवर्षी एकूण चार लाख शेतकऱ्यांचे सुमारे १.८७ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या बाधितांना ३३७.४२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. जून ते सप्टेंबर २०२५ या काळात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एकूण ११६.४० लाख शेतकऱ्यांना सुमारे ९४.८२ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९,०२२.३८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात मोठी घट होताना दिसत आहे.
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली
राज्यात शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणावर तुकडेकरण होत आहे. एकूण १७१.११ लाख शेतकरी खातेदार आहेत. त्यांच्याकडे एकूण २१०.५८ लाख हेक्टर शेती आहे. सरासरी जमीन धारणा १.२३ हेक्टर आहे. एक हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या ५५ टक्क्यांवर गेली आहे. एक ते दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या लहान शेतकऱ्यांची संख्या ३० टक्के, दोन ते चार हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या निम मध्यम शेतकऱ्यांची संख्या १२ टक्के, चार ते दहा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली आहे. जमिनीच्या तुकडेकरणाचा कृषी उत्पादनांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात मका लागवड ३०.२ टक्क्यांनी, तर उसाची लागवड १७.६ टक्क्यांनी वाढली आहे. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस लागवडीत घट झाली आहे. त्यात नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त मक्याच्या उत्पादनात ३९.६ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. अन्य पिकांच्या उत्पादनात घटीचा अंदाज आहे. ज्वारीच्या उत्पादनात सर्वाधिक ४४.१ टक्क्यांनी, कडधान्य पिकाच्या उत्पादनात २८.२ टक्क्यांनी आणि तेलबियांच्या उत्पादनात ४७.४ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. उसाच्या उत्पादनात २२ टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे.
रब्बी हंगामात दिलासा
यंदाच्या रब्बी हंगामात गतवर्षाच्या तुलनेत ६.७ टक्क्यांनी वाढ होऊन ६६.९८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे आणि खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात पेरण्यांची टक्केवारी वाढली आहे. ज्वारी आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेली घट वगळता गहू उत्पादनात ३२ टक्के, मका उत्पादनात ५८.७ टक्के, एकूण तृणधान्यांच्या उत्पादनात २८.३ टक्के. हरभरा उत्पादनात २८.७ टक्के, एकूण कडधान्य उत्पादनात २९.७ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. तेलबियांच्या उत्पादनात १६.२ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज असला तरीही तिळाच्या उत्पादनात ८२.६ टक्के आणि जवसाच्या उत्पादनात २३ टक्के वाढ अपेक्षित आहे.
