बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर आव्हान दिलं आहे. अंनिसने म्हटलं आहे की, शात्री हे चमत्काराने व दैवीकृपेने असाध्य आजार बरे करण्याचे जाहीर दावे करतात. आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे हे दावे सिद्ध करून अंनिसचे २१ लाख रुपयांचे आव्हान त्यांनी स्वाकारावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंनिसने शास्त्री यांना आव्हान देणारं एक परिपत्रक जारी केलं आहे. यात अंनिसने त्यांच्या परिपत्रकात म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३, हा कायदा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्र शासनाने मंजूर केला. देवाधर्माच्या नावाने समाजामध्ये दैववाद, अंधश्रद्धा पसरवून त्या आधारे समाजाचे विविध मार्गाने आर्थिक, मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जात आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्याने राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचा अवमान केला जातोय तरीही बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींसारख्या भोंदू बुवाला मुंबईजवळच्या मीरा रोड येथे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी देणे म्हणजे शासनानेच मंजूर केलेल्या कायद्याची स्वतः शासनानेच पायमल्ली केल्यासारखे आहे.”

अंनिसचं शास्त्रींसाठी दुसरं आव्हान

आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांचे चमत्काराचे दावे सिद्ध करावे आणि अंनिसचे २१ लाख रुपयांचे आव्हान स्वीकारावे असे जाहीर आव्हान अंनिसने केलं आहे. हे अंनिसचं शास्त्री यांच्यासाठी दुसरं आव्हान आहे. याआधी शास्त्री नागपुरात कार्यक्रमासाठी आलेले असताना अंनिसच्या श्याम मानव यांनी शास्त्री यांना ३० लाख रुपयांचं आव्हान दिलं होतं.

हे ही वाचा >> बागेश्वर धामच्या कार्यक्रमात चोरांची हात सफाई, जवळपास पंचवीसहून अधिक लोकांचे दागिने चोरीला

महाराष्ट्र अंनिसने म्हटलं आहे की, “बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे कथित धर्माच्या आडून अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या कार्यक्रमाच्या नावाखाली जाहीरपणे अवैज्ञानिक दावे करत आहेत. त्यामध्ये ते भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य सर्रास नाकारून समाजात चमत्काराचा प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना झालेल्या दैवी कृपेमुळे ते लोकांच्या मनातील भावना, इच्छा, प्रश्न, समस्या ओळखतात, कागदावर लिहितात, त्यावर दैवी तोडगेही सुचवतात. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणखीनच दृढ होण्यास मदत होते. तसेच शास्त्री यांनी महाराष्ट्रातील संत समासुधारकांचाही अवमान केला आहे. विशिष्ट धर्माचा उदो उदो करून, समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात, असे त्यांच्या आजपर्यंतच्या तथाकथित अध्यात्मिक, धार्मिक प्रवचनांच्या व्हिडीओमधून आढळून आले आहे.”

दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांचा मीरा रोड येथील कार्यक्रम शासनाने तातडीने रद्द करावा अशी लेखी विनंती महाराष्ट्र अंनिसने केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra andhashraddha nirmoolan samiti challenge to dhirendra shastri cure diseases miraculously asc
First published on: 19-03-2023 at 10:10 IST