महाराष्ट्र ‘एटीएस’ झोपले आहे का?

आता सरकार बैठका घेत असले तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर पांघरुण घालता येणार नाही.

ashish-shelar-1200
(संग्रहित छायाचित्र)

आशीष शेलार यांचे टीकास्त्र

मुंबई : नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जान मोहम्मद शेखला मुंबईत धारावीतून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईत आणि राज्यात अशी कटकारस्थाने सुरू असताना महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपले आहे का, असे टीकास्त्र भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सोडले. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांचे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेलार यांनी गृहविभागाला लक्ष्य केले.

अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही, तर पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला (लुक आऊट) नोटीस काढणारे पोलीस, हे दहशतवाद्यांच्या बाबत का झोपले होते हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची गोपनीय माहिती पोलिसांना व गृहमंत्र्यांना होती, तर एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असे राजकीय प्रकरण नाही ना, अशी प्रश्नांची सरबत्ती शेलार यांनी केली.

आता सरकार बैठका घेत असले तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर पांघरुण घालता येणार नाही. राज्यकर्ते पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळवितात. आमचे पोलीस सक्षम आहेत पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य -गृहमंत्री

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शेलार यांना दिले. या कारवाईनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली आहे. आपले पोलीसही दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन अशी कारवाई करत असतात. आपल्या पोलिसांच्या गुप्तहेर यंत्रणेचे हे अपयश आहे असे मी म्हणणार नाही. यातले फार बारकावे सांगता येणार नाहीत. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. एटीएसचे या घटनेवर लक्ष आहे, असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra anti terrorism squad bjp mla adv ashish shelar political pressure union ministers arrested akp

ताज्या बातम्या