मुंबई : राज्यात ऑनलाइन ॲप आधारित सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात द्यावी. सहकार भारत टॅक्सीची लवकरच मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सेवा सुरु होण्यासाठी साह्य करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी परिवहन विभागास दिले. ॲप आधारित सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भातील बैठकीत फडणवीस बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्ट चे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी व्ही.सी. के. शर्मा, एस. टी.सी.एल. संचालक अर्चना सिंग, वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे चालकांच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवा राज्यातील छोट्या शहरात सुरु करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
तर राज्यात यापूर्वी ऑनलाइन ॲप आधारित टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांकडून दिली जात आहे. सध्या या टॅक्सी सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेच्या अभावासारख्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नागरिक व प्रवाशांनादेखील विविध अडचणी व समस्या येतात. या पार्श्वभूमीवर चालकांना कामगारांमधून मालकांमध्ये रूपांतरित करण्याचे आणि त्यांना सहकाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय यामागे आहे. राज्य परिवहन महामंडळ देखील ‘छावा’ या नावाने ॲप विकसित करीत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सहकार भारत टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे भारत टॅक्सी सेवेबाबत माहिती दिली, ते म्हणाले. मुंबई येथे भारत टॅक्सीची सुरुवात केली जाणार असून या पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेदेखील ही सेवा पोहोचवली जाईल. देशातील सुमारे २ कोटी व्यावसायिक चालकांचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या आदेशानुसार ‘सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेड’ (भारत टॅक्सी) ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात पुढे आली आहे.
