मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापनाविषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विविध संवर्गांतील रिक्त पदांचा आढावा

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा, तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाचा अभाव असलेल्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पदभरतीची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ती कोणत्याही अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करा

अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता, पदोन्नती आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव अनावश्यक प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालात योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा नियमांनुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

नस्तींचा प्रवास जलद करा

शासकीय कामकाजात नस्ती एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाण्यास लागणारा अनावश्यक वेळ कमी करण्याची गरज असल्याचे आबिटकरयांनी सांगितले. नस्तीचा प्रवास जलद गतीने होऊन निर्णय प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली पाहिजे. कोणत्याही प्रकरणात अनावश्यक विलंब होणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करून कामकाज करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चितीबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गातील हिवताप कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाहीबाबतही चर्चा करण्यात आली.

चांगल्या कामाला प्रोत्साहन, हलगर्जीपणावर कारवाई

आरोग्य विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेने काम करणे अपेक्षित आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे; मात्र कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आबिटकर यांनी दिले.