मुंबई : राज्यभर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या जाळ्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून भेसळ करणारी संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणली. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी टाकलेल्या धाडीत तब्बल १ कोटी ४७ लाख ९३ हजार ९४५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट केले. या प्रकरणी २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १३ आरोपींना अटक करण्यात आली.

कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांच्या संघटित पुरवठ्याबाबत विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर गुप्त तपास सुरू करण्यात आला. माहितीची विविध स्तरांवर पडताळणी केल्यानंतर या जाळ्याचा मागोवा घेण्यात आला. तपासात दूध भुकटी, व्हे किंवा डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले. या साहित्याचा पुरवठा मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

प्रशासनाने केवळ भेसळयुक्त दूध जप्त करण्याऐवजी संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला. तपासादरम्यान मुख्य पुरवठादार, मध्यस्थ, सल्लागार, दूध संकलन केंद्रे, शीतगृहे आणि विक्री व्यवस्थेचा मागोवा घेण्यात आला. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा मुख्य सूत्रधार असल्याचे, तर संदीप लोढा हा या व्यवहारातील सल्लागार असल्याचे समोर आले. शेतकरी, दूध संकलन केंद्रे आणि मोठ्या पॅकिंग केंद्रांना नियमितपणे भेसळयुक्त साहित्य पुरवले जात असल्याचेही तपासात उघड झाले.

पाच जिल्ह्यांत एकाच वेळी धाडी

मुख्य आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ आणि ५ जुलै रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांत एकाच वेळी धाडी टाकल्या. या मोहिमेसाठी सुमारे ३० अन्न सुरक्षा अधिकारी आणि ४० पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. एकूण १३ आस्थापनांवर धाडी टाकून ४९ नमुने संकलित करण्यात आले.

२६ आरोपींविरोधात गुन्हा, १३ जणांना अटक

या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित १३ आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, पुरवठा साखळी, पुरावे आणि इतर सहआरोपींबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे. संबंधित पाच आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.