मुंबई : अशोक खरात प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे. खरात प्रकरण थंड बस्त्यात गेले आहे का. राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा दर्जा काय आहे. सरकार एकीकडे लाडक्या बहिणींची भाषा करीत असताना दुसरीकडे हजारो महिला बेपत्ता होत आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थितीत हाताळण्यात सरकार अपयशी ठरले, असा हल्लाबोल अखेरच्या दिवशी विधान सभेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर केला.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नाना पटोले, जयंत पाटील आदींनी सरकारवर सडकून टीका केली. हिंदू धर्माचा, महिलांचा अवमान करणाऱ्या भोंदू अशोक खरातवर काय कारवाई केली. या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे. हे प्रकरण थंड बस्त्यात गेले आहे का. महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा उमेदवार नरेश ईश्वरपूरकर यांच्या भंडारा येथील घरावर १५० पोलिसांसह पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधींना पोलिसांनी मारहाण केली. राज्यातील महिलांची सुरक्षा अडचणीत आली आहे. महिला, मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नसरापूर येथील बलात्कार प्रकरणी ५५ दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा झाली. पण, बलात्काराच्या अन्य प्रकरणाचे काय झाले. राज्यातील अन्य पिडितांना असा न्याय का मिळत नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थितीत केला.

तरुणांना अमली पदार्थांनी विळखा – जयंत पाटील

अधिवेशन सुरू असताना सभागृहात मंत्री बसत नाही, विभागाचा विषय असून देखील अधिकारी उपस्थित राहत नाही. अध्यक्षांना निर्देश द्यावे लागले. पोलिस दलातील गैरप्रकार वाढले आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. लोकप्रतिनिधीच हातात कायदा घेऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील कुठलाही डॉक्टर सुरक्षित राहिलेला नाही. तरुणांना अमली पदार्थांनी विळखा घातला आहे. हा पोलिसांचा दुसरा अर्थाजनाचा मार्ग बनला आहे.

२०२६ मध्ये आतापर्यंतच २४३८ गुन्हे, ३१७३ आरोपी आणि २३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीची साखळी विस्तारित आहे. बीडच्या एका आमदाराची बायको भेसळयुक्त दूध घेण्यास भाग पडते, अशी कबुली दूध डेअरी चालकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिली. हा आमदार कोण ? असा सवालही पाटील यांनी केला.