मुंबई: राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सरकारचे स्पष्ट धोरण असूनही राज्यभरात राजरोसपणे या नियमांना हरताळ फासला जात असल्याची स्पष्ट कबुली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. त्यावर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठीच्या वाहनांना स्वतंत्र परवाना देण्यात यावा आणि बेकायदेशीरपणे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने जप्त करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे खासगी शाळेच्या व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटनेबाबत रईस शेख यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभिमन्यू पवार, विठ्ठल लंघे, नाना पटोले, संजय मेश्राम आदी सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरुन सरकारला धारेवर धरले. त्यावरशालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, अंबरनाथ येथील एका खासगी इंग्रजी शाळेच्या व्हॅनमधून काही विद्यार्थी प्रवास करत असताना दोन विद्यार्थी खाली पडून जखमी झाले. हे वाहन संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी खासगीरित्या लावलेले होते. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुसऱ्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली.
शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांची पडताळणी, बसमध्ये जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सेवकाची नियुक्ती, वाहतूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच चालकांनी मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन केलेले नसल्याची पोलिसांकडून पडताळणी यांसारख्या बाबी शाळांसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून शालेय वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
तर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठीच्या वाहनांना स्वतंत्र परवाना देण्यात यावा. शिक्षण व परिवहन विभागांनी संयुक्तपणे जबाबदारी घेऊन रिक्षा किंवा बसद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सीसीटीव्ही, जीपीएससह आवश्यक अटी पूर्ण केल्यानंतरच परवाना द्यावा. परवान्याशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने आढळल्यास ती जप्त करण्याची कारवाई करावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विधानसभेत दिले.
