मुंबई : महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार ऑर्केस्टाच्या परवान्याच्या आड काही ठिकाणी डान्सबारमध्ये अश्लिल नृत्याचे प्रकार चालतात. अशा गुन्ह्यात शिक्षेची तरतूद कमी आहे. त्यामुळे आता २०१६ च्या कायद्यांतर्गत ऑर्केस्टांना परवानगी दिली जाणार आहे. परवानगी ऑर्केस्टासाठी घेतली आणि तिथे अश्लिल नृत्य आढळून आले तर तिथे कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र हॉटेल, रेस्टॉरंट व बार रूममधील अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२६ हे विधेयक गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते. चर्चेअंती हे विधेयक मंजूर करण्यात आले.

बेकायदा डान्स बार चालकांकडून महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत ऑर्केस्ट्रा परवाना घेऊन त्याचा गैरवापर केला जातो. हा परवाना घेऊन डान्स बार कायद्यातील निर्बंध पाळले जात नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कायद्यात दुरुस्ती करण्याचे पाऊल उचलण्यात आले. महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३३ अन्वये पोलिस अधिकाऱ्यांना सार्वजनिक मनोरंजनासाठी संगीत, नृत्य व इतर परफॉर्मन्ससाठी परवाने देण्याचे अधिकार आहेत. याच कायद्यांतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रूममधील ऑर्केस्ट्रा व लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सचे परवानेही पोलिस अधिकारी देतात.

अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रूम २०१६ च्या अश्लील नृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवाना घेण्याऐवजी लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सचा परवाना म्हणून वापरतात. त्यामुळे डान्स परफॉर्मन्सवरील कायदेशीर निर्बंध सहजपणे टाळले जात होते. या पळवाटेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे विधेयकात सुधारणा करून आता “लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स (ऑर्केस्ट्रा)” ही संकल्पना आता अश्लील नृत्य प्रतिबंधक कायदा, २०१६ च्या कक्षेत समाविष्ट करण्यात आली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधील लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सचे परवाने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले असून, लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स आणि डान्स परफॉर्मन्स या दोन्हींसाठी आता एकच कायदेशीर चौकट लागू राहणार आहे. त्यामुळे पोलिस आता असा परवाना देऊ शकणार नाहीत, असेही भोयर म्हणाले. यावेळी झालेल्या चर्तेत सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.