पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळ परिसरात मारहाण केल्याच्या आरोपावरून करण्यात आलेले पाच आमदारांचे निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. तसेच संबंधित पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबनही गृहविभागाने मागे घेतले.
बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर वांद्रे-वरळी सी-लिंकवरून गाडीने जात असताना पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले होते. सूर्यवंशी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. त्या वेळी विधिमंडळ प्रेक्षक कक्षाबाहेर आलेल्या सूर्यवंशी यांना आमदारांनी मारहाण केली होती. यावर समाजातील वेगवेगळय़ा स्तरांतून निषेध व्यक्त झाल्यानंतर २१ मार्च रोजी क्षितिज ठाकूर यांच्यासह राम कदम, राजन साळवी, जयकुमार रावळ आणि प्रदीप जैस्वाल यांना निलंबित करण्यात आले होते.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिल्यावर पोलिसांनी क्षितिज ठाकूर व राम कदम या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. गेल्या अधिवेशनाच्या वेळीच या समितीचा अहवाल आला. त्यावेळी तीन आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणीही झाली होती. अखेरीस बुधवारी सर्वच आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले.