दुष्काळावरून विधान परिषदेत खडसे-विरोधकांमध्ये खडाजंगी; गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधी पक्षांनी सोमवारी विधान परिषदेत सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला. जुनेच निर्णय नवे असल्याचे सांगून खडसे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे व अन्य सदस्यांनी केला, तर कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असा सवाल खडसे यांनी केला. त्यावरून खडसे व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि अखेर सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी टंचाई निवारण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा अपघात विमा योजना सुरू केल्याचे खडसे यांनी सांगितले. त्याला धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला. हा निर्णय आघाडी सरकारच्या काळातच २००५-०६ मध्ये झालेला आहे, त्या वेळी मोदीसाहेब कोठे होते, असा उलट सवाल त्यांनी खडसे यांना केला. मागेल त्याला काम ही सरकारची घोषणा फसवी आहे, बीड जिल्ह्य़ातील चारशे गावांनी रस्त्यांच्या कामांची मागणी केली, तरी ती मान्य केली जात नाही. शिधापत्रिकेशी आधारपत्रिकेचा नंबर संलग्न करण्याच्या नावाखाली गेल्या तीन महिन्यांपासून शिधावाटप दुकांनांमध्ये धान्यच मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला.
दुष्काळी भागात परिस्थिती अतिशय स्फोटक आहे, कोण कोणत्या पक्षाचा आहे त्याचा विचार केला जाणार नाही, या भागात पुढारी गेला तर जनतेचा त्याला मार खावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
खडसे यांनीही आक्रमकपणे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना राजकारण करायचे आहे, आधीच्या सरकारची पापे आम्ही फेडतोय, हा काही एका वर्षांचा प्रश्न नाही, असे त्यांनी सुनावले.
माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी ७० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, असे सांगितले जाते, मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या, त्यामुळे कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. त्यावर विरोधकांनी सभात्याग केला.