मुंबई : राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली जागावाटप यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत राज्यातील १६६ आयुष महाविद्यालयांमधील ११ हजार २७२ जागांपैकी १० हजार ५१९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. उर्वरित ७५३ जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ७ हजार ५४६ जागांचे वाटप बीएएमएस अभ्यासक्रमासाठी झाले आहे.

आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाच्या ११३ महाविद्यालयांतील ७ हजार ६८९ जागांपैकी ७ हजार ५४६ जागांचे वाटप झाले. यामध्ये १६ शासकीय महाविद्यालयांतील १ हजार १५७, तर ९७ खासगी महाविद्यालयांतील ६ हजार ३८९ जागांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या १४३ जागा रिक्त आहेत. होमिओपॅथी (बीएचएमएस) अभ्यासक्रमासाठी ४८ महाविद्यालयांतील ३ हजार ३३३ जागांपैकी २ हजार ७२७ जागांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी दोन शासकीय महाविद्यालयांमध्ये १३४, तर ४६ खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार ५९३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. युनानी (बीयुएमएस) अभ्यासक्रमासाठी मात्र उपलब्ध जागांपैकी जवळपास सर्वच जागांचे वाटप झाले आहे. पाच महाविद्यालयांतील २५० जागांपैकी २४६ जागा विद्यार्थ्यांना मिळाल्या असून, केवळ चार जागा रिक्त आहेत. दोन शासकीय महाविद्यालयांतील सर्व १०२ जागा भरल्या असून, तीन खासगी महाविद्यालयांतील १४८ पैकी १४४ जागांचे वाटप झाले आहे.

१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चिती

पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे आणि शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे.

अभ्यासक्रम—–महाविद्यालये—–उपलब्ध जागा—-वाटप—-रिक्त

बीएएमएस—-११३—–७,६८९—–७,५४६—-१४३

बीएचएमएस—-४८—-३,३३३—–२,७२७—–६०६

बीयुएमएस—-५——२५०—–२४६——४

एकूण—–१६६—–११,२७२—–१०,५१९—–७५३