मुंबई : शैक्षणिक वर्षे २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येत असलेल्या बॅचलर ऑफ एज्युकेशन – बीएड (जनरल व स्पेशल) आणि बीएड (इएलसीटी) या अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे नागपूर, नांदेड आणि परभणी येथील तीन केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सीईटी कक्षावर ओढवली आहे.

बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीला २७ मार्च रोजी सुरुवात झाली. २७ ते २९ मार्च दरम्यान चालणाऱ्या या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नांदेड, परभणी व नागपूर येथील केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परभणी व नांदेड येथे सकाळच्या सत्रात तर नागपूर येथे दुपारच्या सत्रामध्ये एक परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

नांदेड येथील मराठवाडा परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये नेटवर्क गेले. यामुळे या परीक्षा केंद्रातील सकाळच्या सत्रातील २९१ विद्यार्थी व दुपारच्या सत्रातील २७८ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३० अशी असतानाही अनेक तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या नेटवर्क सुविधेचा केंद्रावर पूर्णतः अभाव होता.

अनेक विद्यार्थ्यांना एक-दोन प्रश्न सोडवताच सर्व्हर डाऊन झाल्याने बाहेर थांबावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि तांत्रिक बिघाड यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. नागपूरमध्ये दुपारच्या सत्रात वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना विद्युतप्रवाह खंडीत झाल्यामुळे तेथील यंत्रणा बंद पडली, यामुळे या परीक्षा केंद्रातील दुपारच्या सत्रातील ३०० विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

केवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर हॉल तिकीट तपासणी आणि ओळख पडताळणीसाठीही केंद्रावर पुरेशी यंत्रणा नव्हती. ओळख पडताळणीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे मौल्यवान वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर अपुऱ्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक नुकसान झाले असून, राज्य सामाईक परीक्षा कक्षाने या प्रकरणाची दखल घेऊन फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. या तीन परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा २८ किंवा २९ मार्च २०२६ रोजी घेण्यात येईल. याबाबत विद्यार्थ्यांन ई-मेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचे सुधारित प्रवेश पत्र डाउनलोड करावे, असे सीईटी कक्षानी सांगितले.

तीन सत्रात झाली परीक्षा

सकाळच्या सत्रात २१ हजार ५५५ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी ही सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ९०.३९ टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण २०७१ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली.

दुपारच्या सत्रात २२ हजार २०० विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ८७.७४ टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण २ हजार ७२१ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. सीईटी प्रवेश परीक्षा दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते दुपारी ४.३० या वेळेत झाली.

सायंकाळच्या सत्रात १० हजार २७९ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार १९९ विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षा दिली. यानुसार या सीईटी प्रवेश परीक्षेला ८९ .४९ टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती होती. एकूण १०८० विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. ही सीईटी प्रवेश परीक्षा सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत झाली.