मुंबई: राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठीत केलेली उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. समिती प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद साधणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भरती परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांची सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागाला भेट देऊन विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित हितधारकांशी चर्चा व सल्लामसलत करेल. त्यांची मते आणि सूचना विचारात घेऊन परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
समितीचे विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक
पुणे विभाग — १२ सप्टेंबर
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभाग — १६ सप्टेंबर
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर</p>
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती विभाग — १७ सप्टेंबर
स्थळ : अमरावती</p>
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण विभाग — २९ सप्टेंबर
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक विभाग — ३० सप्टेंबर
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
परीक्षेमधील सुधारणांबाबत नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत समिती शिफारशी करणार आहे.
