मुंबई : औषध निर्मितीसाठी अद्यापही परदेशावरच अवलंबून राहावे लागते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्यकता असल्याने ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रात जैव विज्ञान संशोधन आणि इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून औषध निर्मितीसाठी संशोधनावर भर देण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे औषध निर्मितीतील खासगी कंपन्यांनाही संशोधनासाठी या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रात नाविन्यता उद्यान (इनोव्हेशन पार्क) उभारण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.

महाराष्ट्रात जैव विज्ञान संशोधन आणि इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनमंत्री झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. केंद्र सरकारचा अशी केंद्रे सुरू करण्यावर भर सून गुजरात, आंध्र प्रदेश तसेच हिमाचल प्रदेश या ठिकाणी अशी संशोधन केंद्रे उभारण्यात येत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून औषधे, गोळ्या, कॅप्सुल्स इत्यादींच्या विकासासाठी जैविक व रासायनिक संशोधनासाठी प्रयोगशाळा (फॉर्म्युलेशन लॅब) उभारण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळा सार्वजनिक व खासदगी भागीदारीतून उभारण्यात येणार आहेत.

औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, आजारांचे निदान आणि डिजिटल अरोग्याच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (औषधे) श्री दा रा गहाणे, गिरीश हुकरे, व्ही. टी.जाधव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यातून राज्यातील औषध निर्मिती उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा, रोजगार निर्मिती, जागतिक दर्जाची औषध निर्मिती, वैद्यकीय उपकरणांसाठी परिपूर्ण संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती झिरवळ यांनी दिली.