मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरलेले नाही, तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार बोकाळला असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. फडणवीस म्हणाले, राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. मंत्र्यांकडून दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहेत. जिल्ह्या- जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचे अवैध रेती व दारूचे धंदे करणाऱ्यांशी साटेलोटे सुरु आहे.  राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत दिलेली नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. सरकार महिलांना संरक्षण देऊ शकलेले नाही. शक्ती कायदा करण्याचे पोकळ आश्वासन सरकारने दिले, पण काहीच झालेली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

नांदेड, अमरावती, मालेगाव  हा प्रयोग

नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेल्या दंगलीच्या घटना साध्या मानू नयेत. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. बांगलादेशमध्ये २६ ऑक्टोबरला  हिंदूूंवर अत्याचार होतात. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. त्यानंतर २८ ऑक्टोबरला समाजमाध्यमांवर अफवा पसरविल्या जातात. जुन्या मिरवणुकीची छायाचित्रे दाखवून हिंदूूकडून मुस्लिमांवर अन्याय करीत असल्याचा आरोप केला जातो. ही बाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना माहीत असूनही  त्रिपुरात  मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे समाजमाध्यमांवर त्यांनी नमूद केले. लगेच ११ नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळय़ा शहरात हे कसे घडू शकते. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. ज्यावेळी हिंदूूंची दुकाने जाळली गेली, त्यावेवळी महाविकास आघाडीतील एकही नेता काही बोलला नाही. भाजपने दंगल घडविल्याचा आरोप केला गेला आणि मलिकांनी मुंबईतून पैसे दिले गेल्याचे सांगितले. अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना अटक केली गेली. अमरावतीत राज्य राखीव पोलिस दलाच्या सात कंपन्या होत्या. पण त्यांना हिंसाचार रोखण्याचे आदेशच दिले न गेल्याने परिस्थिती चिघळली व पोलिसांवर हल्ले झाले. आझाद मैदानावर हेच झाले होते. अचानक पोलिसांवर दगडफेक कशी झाली व त्यासाठी कोणाला अटक झाली, असा सवाल फडणवीस यांनी केला.