दहावी-बारावीची यंदा लेखी परीक्षा ; शिक्षण विभागाची चाचपणी; प्रक्रिया सोपी करण्यावर भर

 इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी करोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेच्या स्वरूपात बदल केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सीबीएसई-आयसीएसई  केंद्रीय शिक्षण मंडळांप्रमाणे अंतर्गत मूल्यांकन किंवा दोन सत्रांतील लेखी परीक्षेनुसार दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्याऐवजी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रचलित पद्धतीनुसारच लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर के ला जाणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर लगेचच शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत घोषणा होणार असून परीक्षा, निकालांबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या मनात असलेला संभ्रम दूर केला जाईल.

शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी, मुख्याध्यापक, मॉडरेटर, संस्थाचालक, शिक्षक आदी परीक्षांशी संबधित मंडळींशी नुकतीच चर्चा केली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संबंधितांनी एकमुखाने नेहमीच्या वार्षिक लेखी परीक्षेनुसारच दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्यात यावे, अशी सूचना केली. तसेच नवीन कोणताही परीक्षा पॅटर्न आणून विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याऐवजी ८०-२० यानुसारच निकाल जाहीर करण्यात यावा, असा विचार संबंधितांनी मांडला. 

 इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी करोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेच्या स्वरूपात बदल केला आहे. फेब्रुवारी-मार्च दरम्यान तिसरी लाट उद्भवल्यास लेखी परीक्षा घेता येणार नाही. म्हणून ऑक्टोबरमध्ये पहिल्या सत्राची आणि फेब्रुवारीत दुसऱ्या सत्राची परीक्षा घेऊन एकत्रित निकाल लावण्याच्या दृष्टीने सीबीएसईने नियोजन केले आहे. शिवाय अंतर्गत मूल्यांकनही गृहीत धरले जाईल. आयसीएसईनेही थोडय़ाफार फरकाने हेच स्वरूप स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळ दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत नेमके काय धोरण अवलंबते, याबाबत शाळा संभ्रमात होत्या. परंतु, आता परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याची वेळ टळून गेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये नेहमीप्रमाणे वार्षिक लेखी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यात यावा, अशी सूचना मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ अशा संबंधित सर्वच गटांकडून करण्यात आली. परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच असावे, अशी सूचनाही या वेळी पुढे आली.

होणार काय?

 दहावी- बारावीच्या लेखी परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२२ दरम्यान घेण्याच्या दृष्टीनेही मंडळाने चाचपणी सुरू केली आहे. याबाबत दिवाळीनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

..तरच अंतर्गत मूल्यांकनाद्वारे निकाल

गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेता न आल्याने शाळांनी के लेल्या अंतर्गत मूल्यांकनाद्वारे दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्या वेळी ऑनलाइन परीक्षेचा पर्यायही पुढे आला होता. मात्र, दरवर्षी दहावीला १६ लाख तर बारावीला १४ लाख विद्यार्थी बसतात. इतक्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेची व्यवस्था करणे मंडळाला शक्य नाही. त्यामुळे मंडळाचा भर लेखी परीक्षेवरच असेल. विद्यार्थ्यांचा दहावीचा अभ्यासक्र म पूर्ण होत आल्याची हमी अनेक मुख्याध्यापकांनी या बैठकीत दिली. या शिवाय गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन अनेक शाळांनी अंतर्गत मूल्यांकन सुरू ठेवले आहे. त्यामुळे करोनामुळे लेखी परीक्षा घेता नाहीच आल्या तर त्या आधारे निकाल जाहीर करता येईल, असा विचारही या वेळी पुढे आला.

तिसऱ्या लाटेची अद्याप तरी शक्यता दिसत नाही. त्यामुळे संबंधितांनी केलेल्या सूचनांनुसारच राज्य शिक्षण मंडळ यंदा परीक्षांचे नियोजन करेल. याबाबत आणखी एक बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करू.

 – विशाल सोलंकी, शालेय शिक्षण आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra board 10th 12th exams 2021 to be held offline zws

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी