मुंबई : बारावीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत. या परीक्षा शांत, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत. प्रश्नपत्रिका गळती, कॉपी साहित्य पुरवठा किंवा इतर गैरप्रकारांना आळा बसावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

बारावी व दहावीच्या परीक्षा पारदर्शक, काॅपीमुक्त व निकोप वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण व प्रभावी अमलबजावणीसाठी राज्य मंडळाकडून स्वतंत्र शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय दक्षता समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्यांना या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार बारावी व दहावीच्या परीक्षा केंद्रांवर काॅपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणापासून ५०० मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्रे परीक्षा कालावधीमध्ये बंद ठेवण्याचे निर्देश राज्य समितीला देण्यात आले आहेत.

राज्यस्तरीय समितीमध्ये सर्व परिक्षेत्रातील विशेष पोलिस महानिरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने ही झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत समित्या जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर निकोप वातावरण राखण्यासाठी आवश्यक नियोजन करणार आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रांवरील भौतिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि सीसी टीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री केली जाणार आहे.

संवेदनशील व उपद्रवी म्हणून ओळखल्या गेलेल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणी सीसी टीव्ही चित्रिकरणासह ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख केली जाईल. प्रश्नपत्रिका वाहतूक व उत्तरपत्रिका संकलनासाठी शासकीय वाहने उपलब्ध करून देणे, तसेच पोलिस बंदोबस्त देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त करून परीक्षा केंद्रांची अचानक तपासणी केली जाईल. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रांवर बाह्य हस्तक्षेप होऊ नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ‘महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रकार कायदा १९८२’ची कठोर अंमलबजावणी करून गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.