मुंबई : करोनानंतर राज्यात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे फुटलेले पेव आटोक्यात आणण्यासाठी आता २०३१ पर्यंत राज्यात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राज्यात कौशल्याधारित शिक्षणाला गती देण्यासाठी नवीन कौशल्य विकास केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठकीत घेण्यात आला.
करोना काळात राज्यातील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (पीसीआय) पदविकाच्या २२० आणि पदवीच्या ९२ नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली होती. मात्र या महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याचे उघड झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे या संस्थांची तपासणी केली.
त्यातील पदवी अभ्यासक्रमाची ४८ तर पदविका अभ्यासक्रमाची १२८ महाविद्यालये पीसीआयचे निकष पूर्ण करत नसल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पीसीआयने त्यांच्यावरील स्थगिती मागे घेतली होती. राज्यात औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या जवळपास तीस टक्के जागा रिक्त राहात आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून ते २०३०-३१ या कालावधीत राज्यात नवीन बी.फार्मसी आणि डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्था उघडू नयेत तसेच विद्यमान संस्थांमधील प्रवेशक्षमता वाढविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांनाही कळविण्यात यावे. अशाही सूचना त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी औषधनिर्माण कंपन्यांसोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रात्यक्षिके आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता
राज्यातील मानव संसाधन सक्षम करण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा बृहत आराखडा मंजूर करण्यात आला. मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे विविध अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही कौशल्यांचे शिक्षण दिली जात आहे. एनईपी, एनएसक्यूएफ आणि एनसीआरएफ फ्रेमवर्कनुसार तयार केलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवत आहेत. आतापर्यंत सुमारे ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी नवीन कौशल्य केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
बाटूचा बृहत् आराखडा मंजूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २०२५-२०३१ कालावधीसाठीचा बृहत् आराखडा बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार गडचिरोली, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, धाराशिव, सिंधुदुर्ग व परभणी या जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, धाराशिव, सिंधुदुर्ग व परभणी या जिल्ह्यात बी. व्होक अभ्यासक्रमांची महाविद्यालये, धाराशिव व परभणी या जिल्ह्यात वास्तुशास्त्र अभ्यासक्रमांची तर नंदुरबार व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात एचएमसीटी अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे. — औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील
वर्ष – संस्था – जागा – एकूण प्रवेश – रिक्त जागा
२०२४-२५ – ५४१ – ४८०५१ – ३१८२७ – १६२२४
२०२३-२४ – ४५३ – ४२७९४ – २८३८७ – १४४०७
२०२२-२३ – ३९६ – ३१८१० – २८२१९ -३५९१
