मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बीएस्सी परिचारिका अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीला सुरूवात केली आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून, पहिल्या फेरीचे जागावाटप १५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
सरकारी, शासकीय अनुदानित, महानगरपालिका, खासगी विनाअनुदानित, तसेच शासनाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या परिचारिका महाविद्यालयांमधील प्रवेश ‘एमएच-नर्सिंग सीईटी २०२६’मधील गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहेत. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी २ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अपलोड कराव्या लागणार आहेत. आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या उमेदवारांचा संबंधित प्रवर्गातील दावा ग्राह्य धरला जाणार नाही किंवा त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो.
आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि लागू असल्यास नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे नोंदणीच्या वेळी तयार ठेवणे आवश्यक आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी वैध आणि महाराष्ट्र सरकारच्या विहित नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ओबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश नोंदणीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
पात्रता निकष, समुपदेशन प्रक्रिया तसेच महत्त्वाच्या सूचनांचा समावेश असलेली सविस्तर माहिती पुस्तिका सीईटी कक्षाच्या अधिकृत प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. केवळ नोंदणी केल्यामुळे प्रवेशाचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. प्रवेश हा सर्व पात्रता अटींची पूर्तता व कागदपत्रांची पडताळणी यावर अवलंबून असेल.
नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी : २ सप्टेंबरपर्यंत
- नोंदणी शुल्क भरणे : ३ सप्टेंबरपर्यंत
- कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे : ४ सप्टेंबरपर्यंत
- ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी : ६ सप्टेंबरपर्यंत – तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर : ६ सप्टेंबर २०२६ – हरकती व तक्रारी सादर करणे : ७ ते ८ सप्टेंबर (रात्री ८ पर्यंत)
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : ११ सप्टेंबर – ऑनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया : १२ ते १४ सप्टेंबर (सायंकाळी ५.३० पर्यंत)
- पहिल्या फेरीचे जागावाटप जाहीर करणे : १५ सप्टेंबर
