महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्षांचा नवा अंक गुरुवारी पाहायला मिळाला़ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणांच्या गोंधळात राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत विधिमंडळातील अभिभाषण आटोपले आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते सभागृहातून तडक निघून गेले. राज्यपालांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यातच राज्यपालांनी सहकार कायद्यात बदल करणारे विधेयक परत पाठवल्याने हा संघर्ष अधोरेखित झाला़
मुंबई : नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या सत्ताधाऱ्यांच्या घोषणांच्या गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघ्या दोन मिनिटांत अभिभाषण आटोपते घेतले आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते सभागृहातून तडक निघून गेले. राज्यपालांची ही कृती राज्याचा अवमान करणारी असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीने केला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. अभिभाषणासाठी राज्यपालांचे मध्यवर्ती सभागृहात आगमन होताच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा सत्ताधारी बाकावरून देण्यात आल्या. सुरुवातीस राष्ट्रगीत होऊ द्या, असे सांगत राज्यपालांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही घोषणाजी सुरूच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सत्ताधारी शांत झाले. राष्ट्रगीत झाल्यावर कोश्यारी यांनी अभिभाषणास सुरुवात केली. ‘माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असा उल्लेख राज्यपालांनी करताच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू झाला. त्याच वेळी विरोधकांनी फलक फडकवत नबाव मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी करताना विरोधक सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर बसले होते. यामुळे नेमके घोषणा कोण देत आहे यावरून ज्येष्ठ मंत्रीही गोंधळले होते.
दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या, नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का, अशा घोषणा देतानाच बॅनरही फडकविण्यात आले. एकीकडे अभिभाषण आणि दुसरीकडे घोषणाबाजी सुरू असताना राज्यपालांनी सुरुवातीच्या काही ओळी आणि मराठीच्या मुद्याचे वाचन करीत अभिभाषण आटोपते घेतले. राज्यपालांचे अभिभाषण पूर्ण झाल्यावर प्रथेप्रमाणे पुन्हा राष्ट्रगीत होते. अभिभाषण दोन मिनिटांत संपवून राज्यपाल कोश्यारी हे तडक बाहेर पडले. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा चकित झाले होते.
शीर्षांसन घालून राज्यपालांचा निषेध
राज्यपालांच्या या मनमानीबद्दल सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कोश्यारी यांच्या कृतीचा निषेध केला. सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला आणि त्यांना परत बोलाविण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी तर थेट शीर्षांसन करीत राज्यपालांचा निषेध केला. या वेळी उपस्थित आमदारांनी ‘खाली डोके वर पाय’ अशा घोषणा दिल्या. भाजप आमदारांच्या गोंधळामुळेच व्यथित होऊन राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषण थांबवून सभागृह सोडल्याचा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अवमान करणे अपेक्षित नव्हते, अशा शब्दांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
मलिक यांचा राजीनामा आवश्यकच : फडणवीस
राज्यपाल कोश्यारी अभिभाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करीत आहात, पण तेच सरकार जर दाऊदला शरण जात असेल तर हे भाषण कशाकरता ऐकायचे हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करीत होते की, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.