मुंबई : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहेत. एनएचएसआरसीएलने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील महाराष्ट्रामधील डहाणू येथील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला.
जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामधील १५६ किमी मार्ग महाराष्ट्रात येतो. राज्यात वांद्रे -कुर्ला संकुल (मुंबई) येथे एक भुयारी स्थानक, वांद्रे– कुर्ला संकुल – ठाण्यातील शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा, शिळफाटा – झरळी गावदरम्यान (महाराष्ट्र-गुजरात सीमा) १३५ किमी मार्गिकेचा समावेश आहे. यासह ठाणे, विरार, बोईसर ही स्थानके असणार आहेत.
राज्यात १२४ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल) आहेत. शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित केले आहेत. त्यापैकी सध्या ५ यार्ड्स कार्यान्वित आहेत. ही तंत्रज्ञान प्रणाली एप्रिल २०२१ पासून बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरात आहे आणि गुजरातमध्ये एकूण ३०७ किमी लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण करण्यात आला आहे. नुकताच विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबचे कास्टिंग उभारले आहे.