maharashtra bypoll elections 2023 ncp claim on both constituency in pune bypoll elections zws 70 | Loksatta

राष्ट्रवादीचा दोन्ही तर शिवसेनेचा चिंचवडवर दावा; महाविकास आघाडीत एकवाक्यतेचा अभाव

महाविकास आघाडीने चिंचवडची जागा शिवसेनेला सोडावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे.

maharashtra bypoll elections 2023 ncp claim on both constituency in pune bypoll elections
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo)

मुंबई:  पुणे शहरातील विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपावरून जोरदार ‘दावेदारी सुरू झाली आहे. कसबा पेठ  आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर चिंचवडवर शिवसेनेने दावा केला आहे.

भाजपच्या मुक्ता टिळक या कसब्यातून तर चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप निवडून आले होते. या दोघांच्या निधनाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कसबा विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सहा वेळा येथे भाजपचा आमदार निवडून आला आहे. गेल्यावेळी एकतर्फी झालेल्या लढतीत काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव झाला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली. या दोन जागांवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगितला आहे. दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीने हक्क सांगितला असताना शिवसेनेने चिंचवडवर आपला हक्क असल्याचे बैठक घेऊन बुधवारी जाहीर केले. २०१९मध्ये  शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना एक लाखाहून अधिक मते घेत भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक शिवसेनेने (ठाकरे) लढावी, अशी पक्षातील स्थानिक नेत्यांची आणि तेथील मतदारांची मागणी आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीने चिंचवडची जागा शिवसेनेला सोडावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे. तेथील जनतेचीसुद्धा हीच इच्छा आहे. कलाटे यांचा २०१९ मध्ये थोडक्यात पराभव झाला असला तरी यंदा ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 03:08 IST
Next Story
‘पठाण’ला देशभरात उदंड प्रतिसाद; पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खेळांच्या संख्येत वाढ